खासदार हेमंत गोडसे यांनी या संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून, या चौकात मुंबई-आग्रारोड आणि नाशिक-पुणे या दोन महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावरून नाशिकरोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वांत दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे. परिणामी द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल या दरम्यान वाहतुकीची सतत कोंडी होत असते. द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरूनगर परिसरातही वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने द्वारका चौक ते नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकापर्यंत उड्डाणपूल उभारणीचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित होता. यातूनच गडकरी यांनी प्रस्तावित उड्डाणपुलाला तत्त्वत: मान्यता देऊन सुमारे ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र सदर रस्ता हा महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवालदेखील तयार करण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.
त्याची दखल घेत गुरुवारी (दि. १९) केंद्रीयमंत्री गडकरी यांनी द्वारका-दत्तमंदिर रस्त्याचा भारतमाला योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावित पुलासाठी आता केंद्र सरकारचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून निधी उपलब्ध होणार आहे.
चौकट===
राजकीय श्रेयवाद सुरू
सन २०१२ मध्ये खासदार समीर भुजबळ असताना शरद पवार यांच्या उपस्थितीत या प्रस्तावित उड्डाणपुलाची घोषणा करण्यात येऊन नाशिक-पुणे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला. नाशिकरोड येथे या पुलाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये हेमंत गोडसे निवडून आले. दरम्यानच्या काळात या मार्गावर असलेले दुतर्फा मोठे वृक्ष कापण्यास मनाई असल्याने प्रकरण अनेक वर्षे न्यायप्रविष्ट होते. सन २०१७ मध्ये नितीन गडकरी यांच्याकडे भाजपाच्या आमदारांनी द्वारका ते नाशिकरोडच्या वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केल्याने गडकरी यांनी निधी देण्यास तत्त्वत: मान्यता दिली होती. आता मात्र खासदार गोडसे यांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे झाल्याचे म्हटले आहे, तर भाजपाने गेल्या आठवड्यात दिल्लीत पक्षश्रेष्ठींची व गडकरींची भेट घेऊन उड्डाणपुलासाठी निधीची मागणी केल्यामुळेच भारतमाला योजनेत त्याचा समावेश झाल्याचे म्हटले आहे.
चौकट===
असा असेल उड्डाणपूल
द्वारका ते दत्तमंदिरपर्यंत उड्डाणपूल उभारणीचा पहिला प्रकल्प असला तरी, वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या पाहता व संभाव्य मेट्रो प्रकल्पाचा विचार करता हा उड्डाणपूल द्विस्तरीय असण्याची चिन्हे आहेत. मेट्रो, त्याखाली मोटार वाहनांसाठी उड्डाणपूल व नाशिक-पुणे महामार्ग अशी त्याची रचना असेल. या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी, याबाबतचा अहवाल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे प्रादेशिक अधिकारी भाऊसाहेब साळुंके यांनी सांगितले.