लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील द्राक्षपंढरी सध्या वातावरणातील बदलावाच्या परिस्थितीमुळे चिंतातुर झाली आहे. त्यामुळे यंदाचा द्राक्षे हंगाम कसा घ्यावा ही मोठी समस्या निर्माण झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.दिंडोरी तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून नामोल्लेख केला जातो. परंतु सध्या या द्राक्षपंढरीला हवामानातील बदल, वातावरणातील बदलाव आदी संकटांनी आक्रमण केल्याने द्राक्षहंगाम पुढील काळासाठी डोकेदुखी बनती काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला असून, शेतकरीवर्गाच्या तोंडातला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने भांडवलाचा तुटवडा ही गहन समस्या शेतकरीवर्गापुढे आ वासून उभी राहिली आहे. तालुक्यात सध्या त्रिसूत्री वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी दाट धुके, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी परतीच्या पावसाचे आगमन यामुळे शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्षे पिकाचे माहेरघर समजले जाणारे लखमापूर, म्हेळुस्के, ओझे, करंजवन, दहिवी, दहेगाव वागळुद, अवनखेड, कोराटे, मोहाडी, मडकीजांब, जांबुटके, परमोरी, राजापूर, मातेरेवाडी, बोपेगाव, खेडगाव, सोनजांब, तिसगाव बहादुरी, मावडी, शिवरे बोराळे, वणी इत्यादी गावांना वातावरणातील बदलावाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
द्राक्ष हंगामात अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याने द्राक्षे पीक जिवावर बेतत आहे. भरपूर खर्च करून ही उत्पन्नाची एक कवडीही हातात न मिळाल्याने पुढे भांडवल कसे उभे करायचे हा प्रश्न भेडसावत आहे. - जयदीप देशमुख, द्राक्ष उत्पादक, करंजवण