नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त महानगरातील कपालेश्वर, सोमेश्वर, नीळकंठेश्वरसह अन्य शिवमंदिरांबाहेर फूलमाळांसह रोषणाईने सजावट करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे मंदिरे खुली नसल्याने भाविकांनी केवळ कळसदर्शन घेतले. तर कपालेश्वर मंदिराच्या वतीने परंपरेप्रमाणे निघणारी पालखी मिरवणूक संपूर्ण पंचवटीऐवजी केवळ मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घालून सांगता करण्यात आली. तर सोमेश्वर मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा आणि अभिषेक करण्यात आला, दरम्यान श्रावणी सोमवारच्या ब्रम्हगिरी परिक्रमेवर निर्बंध असल्याने भाविक यंदा फेरीला मुकले आहेत.
जिल्ह्यात दरवर्षी विशेषत्वे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी लाखोंच्या संख्येने भाविक ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी बाहेर पडायचे. मात्र, यंदा फेरीवर देखील निर्बंध कायम असल्याने भाविकांची तिसरी फेरीदेखील हुकली. श्रावण महिना आणि त्यातही श्रावणी सोमवारचे महात्म्य विशेष आहे. तसेच शिव पूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, यंदा भाविकांना तेदेखील करता आले नाही. दरम्यान सोमेश्वरच्या मंदिरात विश्वस्त बापूसाहेब गायकर, गोकुळ पाटील, राहुल बर्वे, बाळासाहेब लांबे, अविनाश पाटील आणि महेश भुतडा यांच्या हस्ते महापूजा आणि अभिषेक करण्यात आला. तर कपालेश्वर मंदिरात सकाळी अभिषेक, त्यानंतर मुखवट्याची पालखीतून मिरवणूक, गंगेवर मुखवट्याला स्नान घालून मंदिराभोवतीच तीन प्रदक्षिणा घालून अभिषेक करण्यात आला. यावेळी मंदिराचे विश्वस्त आणि व्यवस्थापक संकल्प मुर्तडक उपस्थित होते. दरम्यान तिसऱ्या सोमवारसाठी देखील फेरीला परवानगी नसल्याने शहरातील बसस्टॅन्ड गतवर्षी प्रमाणेच भाविकांविना सुने सुने होते.
इन्फो
शिव मंदिरांवर रोषणाई
महानगरांसह परिघातील शिव मंदिरांवर श्रावण सोमवार निमित्त रोषणाई तसेच फुलांची सजावट करण्यात आली होती. कपालेश्वर, सोमेश्वर, नीळकंठेश्वर मंदिरांसह त्र्यंबकराजाच्या मंदिराला देखील विशेष सजावट करण्यात आली होती. काही मंदिरांवर रोषणाई, तर काही मंदिरांना झेंडूच्या फूल माळांनी सुशोभित करण्यात आले होते.