घोटी : निसर्गाने अन्याय केलेल्या परंतु स्वत:च्या इच्छाशक्तीपुढे निसर्गालाच आव्हान देण्यासाठी घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाने दिव्यांगांच्या पंखात बळ भरले. नव्या वर्षाचा नवा सूर्य कळसुबाई शिखरावर पाहण्यासाठी गिर्यारोहकांसह दिव्यांगांनी कमाल करून चढाई केली. चढायला अवघड असणारे कळसुबाई शिखर झपाझप चढून भ्रमंती करण्याचे साहस दिव्यांगांनी केले. घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहक आणि दिव्यांग बांधवांनी कळसुबाई शिखरावर विविध उपक्र म घेऊन तिरंगा ध्वज फडकावला.गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वोच्च कळसूबाई शिखरावर दिव्यांग आणि अंध बांधवांना सोबत घेत कळसुबाई शिखरावर चढाई केली. याप्रसंगी विविध उपक्र म राबवून सर्वांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. सूर्यदर्शन होताच तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण अंध दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गिर्यारोहकांनी कळसुबाई शिखरावरील प्लॅस्टिक बाटल्या उचलुन साफसफाई अभियान राबविले.यावेळी शाहीर बाळासाहेब भगत यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. ह्या उपक्रमात शाहीर बाळासाहेब भगत, अशोक हेमके, काळू भोर, बाळू आरोटे, गजानन चव्हाण, प्रशांत जाधव, प्रवीण भटाटे, पंढरीनाथ दुर्गुडे, नितीन भागवत, बालाजी तुंबारे, सोमनाथ भगत, निलेश पवार, दर्शन भोर, किसन दराणे, निलेश आंबेकर आदींसह गिर्यारोहक सहभागी झाले होते.-----------------------------------नववर्षानिमित्त दिव्यांगांनी केलेले चढाईचे साहस भल्याभल्यांना तोंडात बोट घालायला लावणारे ठरले. कोणी कुबड्या घेऊन तर कुणी दोन्ही हातात काठ्या घेऊन कळसुबाई चढत होते. साध्या माणसाला गड चढणे अवघड तिथे या दिव्यांगांची ही हिम्मत पाहून अनेकजण अवाक झाले होते. सोबतीला कळसुबाई मंडळाचे सोबती होते. त्यामुळे सर्वांना सांभाळून नेलं जात होतं. पण दिव्यांगांच्या उत्साहापुढे सार्यांची सोबत कमीच पडत होती.------------------------------चढाई करताना दिव्यांगांना कोणताही त्रास झाला नाही. आम्ही नेहमीच विविध उपक्र माद्वारे वेगवेगळे गड, शिखर दिव्यांग बांधवांसह साजरे करतो. त्यांना मिळालेला आनंद हेच आमचे यश आहे..... पंगूम लंघयते गिरीम! या उक्तीला सार्थ करण्याचे काम कळसुबाई मित्रमंडळाने केले.- भगीरथ मराडे, अध्यक्ष कळसुबाई मित्रमंडळ
दिव्यांगांकडून कळसुबाई शिखर सर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 2:11 PM