नाशिक : महासभेने मागील दाराने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांबाबत आयुक्तांनीही अनुकूलता दर्शविल्यानंतर सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाºयांनी या कामांच्या निविदा काढण्याची घाई चालविली असून, त्यासाठी मुख्य लेखाधिकाºयासह मुख्य लेखापरीक्षकावर दबाव टाकला जात आहे. त्यातूनच शुक्रवारी (दि. २२) काही पदाधिकाºयांची लेखाधिकाºयासोबत खडाखडी झाल्याची मनपा वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. लेखाधिकाºयाने सदर कामांसाठी निधीची तरतूद करायची कोठून, असा प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. महासभेला अंधारात ठेवत सत्ताधारी भाजपाने जादा विषयांच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या कामांचा प्रस्ताव मंजूर केला. बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी लेखीपत्र देऊन आक्षेप नोंदविला, तर शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादीनेही नंतर त्याला विरोधाची भूमिका दर्शविली. दरम्यान, एकीकडे आयुक्तांकडून सदर कामांसाठी चालू अंदाजपत्रकात तरतूदच नसल्याने पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातच कामे प्रस्तावित केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, चार दिवसांपूर्वीच महासभेने ठराव प्रशासनाला पाठविल्यानंतर आयुक्तांनीही या कामांसाठी अनुकूलता दर्शवित आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने कामे हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अगोदरपासूनच सदर कामांसाठी निधीची तरतूदच नसल्याचे सांगत लेखा विभागाकडून असमर्थता दर्शविली जात असताना आयुक्तांच्या अनुकूलतेमुळे सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाºयांना उभारी मिळाली आणि त्यांनी आता कामांच्या निविदा तातडीने काढण्याची घाई चालविली आहे. त्यानुसार, शुक्रवारी मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखा परीक्षकाबरोबर पदाधिकाºयांची खडाखडी झाल्याचे वृत्त आहे. यावेळी सदर पदाधिकाºयाने अन्य कामांबरोबरच डस्टबिन घोटाळ्याबाबतही लेखाधिकाºयाला धारेवर धरल्याचे समजते. खोडा घालू नका एका पदाधिकार्याने मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षकांना अतिरिक्त आयुक्तांकडे बोलावून घेत त्यांना झापायला सुरुवात केली परंतु, या दोन्हीही अधिकाºयांनी संबंधित पदाधिकाºयाला भीक घातली नाही व नियमानुसारच कामे होतील, असे स्पष्ट केले. यावेळी संबंधित पदाधिकाºयाने कामांमध्ये कोणताही खोडा घालू नका, फाइलीबाबत पॉझिटिव्ह भूमिका घ्या, असा सल्ला देत धमकीवजा इशाराही दिल्याने दिवसभर याच गोष्टीची महापालिकेत चर्चा सुरू होती. पदाधिकाºयांचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप वाढत चालल्याने अधिकारीवर्ग मेटाकुटीला आला आहे.
पदाधिकार्याची लेखाधिकार्याशी खडाखडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:12 PM