लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : सायखेड्यासह गोदाकाठ भागातील ३२ गावांत महाराष्ट्र बंदला शेतकऱ्यांसह व्यापारी, नागरिकांनी स्वत:हून बंद पाळून प्रतिसाद दिला. ‘ना पक्षासाठी, ना राजकारणासाठी, आता फक्त आपल्यासाठी’ असे ठामपणे सांगत नाशिकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती, तर भेंडाळी येथे फडणवीस सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी सर्व नागरिक अंत्ययात्रेत स्वयंस्फूर्तीने सामील झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, तर शेतकऱ्यांच्या हाकेला आवाज देऊन सायखेडा शहरातील व्यावसायिकांनी, व्यापारी वर्गाने आज किसान क्रांती संघटनेत सहभाग घेऊन सायखेडा शहरासह पंचक्रोशीतील चांदोरी, चाटोरी, सोनगाव, रामनगर, निपाणी पिंपळगाव, भेंडाळी, महाजनपूर, तळवाडे, करजगाव, शिंगवे, म्हाळसाकोरे, मांजरगाव, नारायणगाव, औरंगपूर, बागलवाडी, भुसे, चापडगाव या गावांत उत्स्फूर्तपणे दिवसभर बंद पाळण्यात आला. डॉक्टर व मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने शेतकरी संपाला पाठिंबा देण्यात आल्याचे निवेदन सायखेडा पोलीस स्टेशनला देण्यात आले.
सायखेड्यासह गोदाकाठ भागात कडकडीत बंद
By admin | Published: June 06, 2017 2:16 AM