नाशिक जिल्ह्यातील सातपूर, अंबड, सिन्नर, मालेगांव, दिंडोरी, इगतपुरी व गोंदे इत्यादी औद्योगिक वसाहती आहेत. हजारो कामगार दररोज एकत्रितपणे काम करीत आहेत. शासनाने लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. त्यात औद्योगिक वसाहतीतील लाखो कर्मचारी, कामगारांचा व त्यांच्या परिवाराचा कोणताही विचार केलेला नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना २५ टक्के क्षमतेने कामावर बोलावले आहे. तर काही खासगी व शासकीय कार्यालयातील कर्मचारी वर्क फॉर्म होम पद्धतीने काम करीत आहेत. मात्र जिल्ह्यातील लाखो कामगारांकडून लहान मोठ्या कारखान्यामध्ये १०० टक्के क्षमतेने उत्पादन प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत कामगार शेकडोच्या संख्येने कोरोनाबाधित होऊन मृत्युमुखी पडत आहेत. रुग्णांची संख्या वाढत असून कंपनी मालक किंवा शासन, प्रशासनाकडे वाढत्या कामगार रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले आहे. रुग्णांसाठी ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नाही. खासगी हॉस्पिटलमध्ये बिलाची लूट चालविलेली आहे. या भयंकर रोगाची साखळी तोडायची असेल आणि निष्पाप लोकांचा बळी वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून कडक लॉकडाऊन जाहीर करून कारखाने बंद ठेवावेत, अशी मागणी प्रभाग सभापती रविंद धिवरे, नगरसेवक दिनकर पाटील, मनसे गटनेता सलीम शेख, शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक माधुरी बोलकर, नयना गांगुर्डे, योगेश शेवरे, मधुकर जाधव, बसपाचे अरुण काळे, बजरंग शिंदे, रवींद्र काळे, गौरव जाधव, विक्रम नागरे, बाळा निगळ आदींसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन केली आहे.
(फोटो २६ सातपूर) - जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतीत लॉकडाऊन लागू करण्याची मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे करताना खासदार हेमंत गोडसे समवेत नगरसेवक दिनकर पाटील.