इंदिरानगर : नगरसेवक आणि अधिकारी यांना काहीच अधिकार उरले नाहीत. सर्वाधिकार जर आयुक्तांनाच बहाल केले असतील तर प्रभाग समित्यांची सभा कशासाठी घ्यायच्या. त्यापेक्षा आयुक्तांच्याच दालनात दरमहा सभा बोलवा आणि प्रभाग सभा बंद करून टाका, असा उद्वेगजनक सवाल पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सभेत अतिक्रमणासह आरोग्य व पाणीपुरवठा या विषयावर जोरदार चर्चा होऊन सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती प्रा. कुणाल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नेहमीप्रमाणे कोरमअभावी सभा एक तास उशिराने सुरू झाली. यावेळी प्रभागातील सभेत प्रस्ताव मांडून, चर्चा होऊनही कामे मार्गी लागत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. सर्वच अधिकार आयुक्तांनाच असतील तर यापुढे दर महिन्याची सभा आयुक्तांच्याच दालनात घेण्याची सूचनाही सदस्यांनी केली. दरम्यान, इंदिरानगरमधील रथचक्र चौकात गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुमारे १० ते १५ भाजीविक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. येत्या दोन दिवसांत भाजीविक्रेत्यांच्या विळख्यातून रथचक्र चौक मोकळा न केल्यास राजीव गांधी भवनसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी दिला. विनायक खैरे यांनी अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. जुने नाशिकमधील रस्ते आणि नगरपालिकेच्या इमारतीभोवतालचे विक्रेत्यांना हटविण्याची सूचना केली तसेच रविवारी पाण्याचा टॅँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली. भाभानगर परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृह व लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याकडेही सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी ‘लोकमत’च्या सीएनएक्स पुरवणीत आलेला वृत्तांतही दाखविण्यात आला. नासर्डी नदीपात्र हे कचऱ्यासाठी कुंडच बनत चालल्याची तक्रार गुलजार कोकणी यांनी केली. यशवंत निकुळे यांनी सहा महिन्यांपासून साईनाथनगर चौफुली येथे सिग्नल यंत्रणा बसविण्याचे काम ठप्प असल्याचे सांगितले. सदर साहित्य हे सिटी गार्डनमध्ये पडून असून, तातडीने सिग्नल यंत्रणा बसवून ती कार्यान्वित करण्याची मागणीही निकुळे यांनी केली. यावेळी १२ लाख रुपये खर्चाच्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. (वार्ताहर)
बंद करा प्रभाग समित्यांच्या सभा!
By admin | Published: December 23, 2014 10:41 PM