नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांची कोंडी करणाऱ्या स्मार्ट सिटी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे येत असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा मेहेर आणि सीबीएस येथील जंक्शनच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. या चौकांमध्ये बॅरिकेट््स आणि दोरखंड लावून रस्ते बंद करण्यात आल्याने रविवारी नाशिककरांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागली.स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील पहिला मात्र केवळ १.१ किमीच्या रस्त्यांसाठी सुमारे १७ कोटी खर्च करण्यात येणार होता. त्यानंतर सुमारे ३१ कोटींपर्यंत खर्च वाढला. टप्प्याटप्याने रस्त्याचे काम करण्यात येत असल्यामुळे हा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. त्यातही निर्धारित वेळेपेक्षा कामाला विलंब झाल्यामुळे नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेकदा यामुळे आंदोलने झाली, तर नगरसेवकांनीदेखील महापालिकेला या संदर्भात धारेवर धरले. दिरंगाई केल्याप्रकरणी आतापर्यंत संबंधित ठेकेदाराला सात कोटी रुपये दंड करण्यात आला असला तरी कामाची प्रगती अजूनही आश्वासक वाटत नाही. रस्ता कधी खुला होणार याकडे नाशिककरांचे लक्ष असतानाच गणेशोत्सवात रस्ता खुला करण्यासाठी घाईघाईतच भर पावसात काम उरकण्यात आले आणि गणेशोत्सवात सीबीएस ते अशोकस्तंभ रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे नाशिकरांची स्मार्ट कोंडी संपली असे वाटत असतानाच आता स्मार्ट सिटी कंपनीने मेहेर आणि सीबीएस चौक बंद करून या चौकांचे काम हाती घेतले आहे.वाहनधारक संतप्तकोणतीही पूर्व सूचना न देता रस्ते बंद केले जात असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला. रस्ते बंद करण्याबाबत कोणतेही आवाहन अथवा पर्यायी मार्गाचा कोणताही पर्याय न देता किंवा तशी व्यवस्था न करता थेट रस्तेच बंद केले जात असल्याने अनेकांचा संताप अनावर झाला. रस्ता ओलांडण्यासाठी वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली.
स्मार्ट रस्ता ‘जंक्शन’साठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:08 AM