नाशिक : पाऊस व धरणांचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यात यंदा १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान जेमतेम ८७ टक्केच पाऊस झाला असून, ब्रिटिशकालीन पद्धतीनुसार हा जलसाठा शासकीय दप्तरात बंद करण्यात आला आहे. यंदा पावसाळ्यातच निर्माण झालेली पाण्याची टंचाई व धरणांमध्येही तशीच परिस्थिती असल्यामुळे यावर्षी डिसेंबरपासूनच जिल्हावासीयांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संपूर्ण पावसाळ्यात फक्त पेठ व सुरगाणा या पावसाच्या माहेरघरीच शंभर टक्क्याहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाली, तर दोन तालुक्यांनी कशीबशी पन्नाशी गाठली आहे.ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे. त्याची नोंद शासकीय दप्तरात केली जात नाही. त्यामुळे ३० सप्टेंबर अखेरच्या पावसावरच धरणाच्या पाण्याचे पुढील नियोजन केले जाते. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २७ टक्क्याने यंदा पर्जन्यमान घटले असून, गेल्यावर्षी ३० सप्टेंबर अखेर जिल्ह्यात ११४.७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची ग्रामीण भागात मागणी वाढली होती. यंदा मात्र जवळपास २७ टक्के पर्जन्यमान घटल्यामुळे शेतकरी व शासकीय यंत्रणा दोन्हीही काळजीत पडले आहे. यंदाच्या पावसाळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या दोन्ही तालुक्यांमध्येदेखील शंभर टक्के पाऊस पडलेला नाही. याठिकाणी अनुक्रमे ९७.२५ व ७२.८५ टक्के पावसाची नोंद करण्यात आल्याने त्यावरून अन्य तालुक्यांमध्ये पावसाची काय परिस्थिती असेल याची कल्पना येते. निफाड तालुक्यात ५० टक्के तर नांदगाव तालुक्यात ४९ टक्केच पाऊस पडल्याने तेथील खरीप पिके तर हातची गेलीच, परंतु यंदा रब्बी हंगाम पूर्ण कोरडा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अवकाळी पाऊस अधूनमधून हजेरी लावत असला तरी, त्याचा आता खरिपाच्या पिकांना काहीच फायदा नाही, मुळात खरीप पिके काढणीवर आली असून, काही पिके तर पावसाअभावी खुरडली गेली आहे. अशा परिस्थितीत यंदा अन्नधान्याच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नाशिक जिल्ह्यातील ८७ टक्के पाऊस शासकीय दप्तरात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 4:15 PM
ब्रिटिश काळापासून १ जूनपासून पावसाळा सुरू होत असल्यामुळे शासकीय दप्तरात तेव्हापासून दैनंदिन पाऊस नोंदविला जातो व ३० सप्टेंबर हा पावसाळ्यातील सर्वात शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे १ आॅक्टोबरनंतर पडणारा पाऊस हा अवकाळी मानला गेला आहे.
ठळक मुद्देपेठ, सुरगाण्यात शंभरी : निफाड, नांदगावला जेमतेम ५० टक्के यंदा अन्नधान्याच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे