संकेत शुक्ल, नाशिक : नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून उतरलेल्या १९ बॅगांची तपासणी का करण्यात आली नाही, असा प्रश्न विचारला जात असतानाच पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांचे नीलगिरी बाग हेलिपॅडवर आगमन होताच निवडणूक आयोगासह पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी बॅगची तपासणी केली. त्यांच्या बॅगमध्ये कपडे, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंशिवाय काहीही सापडले नाही. नाशिकची जागा शिंदे गटाच्या वाटेला आल्यानंतर नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे दौरे वाढले आहेत.
आठवडाभरात शिंदे तिसऱ्यांदा नाशिकमध्ये आले आहेत. ते पहिल्या दिवशी आले तेव्हा त्यांच्यासमवेत असलेल्या बॅगांमध्ये कोट्यवधी रुपये होते, असा आरोप उद्धवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईसह नाशिकच्या सभेत केला होता. शिंदे यांच्याकडे असलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का लागतात? या बॅगांमध्ये नेमकं काय होतं? त्यात ५०० सूट होते की ५०० सफारी? असे प्रश्न राऊत यांनी विचारले होते. नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेतही राऊत यांनी १९ बॅगांमध्ये १९ कोटी रुपये असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे गुरुवारी (दि. १६) नाशिक दौऱ्यावर आले असता तपोवन परिसरातील नीलगिरी बाग येथे हेलिकॉप्टर उतरले असता निवडणूक आयोगाच्या पथकासह पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली. मात्र, त्यात काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.