नाशिक : एकीकडे बरसणारे मेघ अन् दुसरीकडे रिमझिम बरसणारी सतार, अशा अनोख्या योगाचा आनंद नाशिकच्या रसिक कानसेनांनी घेतला. कलारंग उपक्रमात प्रख्यात सतारवादक प्रसाद रहाणे यांच्या बहारदार सादरीकरणाने वर्षाऋतूचा आनंद द्विगुणित केला.
जनस्थान या व्हाॅटस्ॲप ग्रुपमधील कानसेनांनी कलारंग मैफलीचा आनंद घेतला. कलारंगचे पाचवे पुष्प सुप्रसिद्ध सतारवादक प्रसाद रहाणे यांनी गुंफले.
एलिफंटा फेस्टिव्हल, गोपीकृष्ण महोत्सव, केरळमधील सूर्या महोत्सव, खजुराहो फेस्टिव्हल, लंडनमधील पॅलॅडियम थिएटर, अशा नामवंत ठिकाणी सतारवादनाचे कार्यक्रम करणाऱ्या प्रसादजींनी अनेक नामवंत कलाकारांबरोबर सतारीची साथसंगत केली आहे. पंडित शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, सुरेश वाडकर, पंडित जसराज, अशा अनेक दिग्गजांना त्यांनी साथ दिली आहे. सतारवादनाबरोबरच प्रसाद रहाणे तबलावादनातही पारंगत आहेत. कलारंगच्या मैफलीत त्यांच्या सतारवादनाचा आनंद घेण्याचा योग कलाप्रेमींना आला. शास्त्रीय, उपशास्त्रीय, फ्युजन व समकालीन संगीत प्रकारांवर प्रभुत्व असलेल्या प्रसादजींच्या वादनात कलारंगचे रसिक तल्लीन झाले. मैफलीची सुरुवात करताना राग ‘मेघ’ सादर केल्यानंतर आलाप, जोड हे वाजवून झाल्यावर प्रसादजींनी गत सादर केली. गत सादर करताना तबल्याची साथ अतिशय उपयुक्त ठरते. सतार वर द्रुत तीन ताल, झपताल वाजवताना सुजित काळे यांनी अतिशय सुंदर तबल्याची साथ दिली. परंपरा आणि आधुनिकता, चिंतन आणि रंजकता यांचा एक सुरेल संगम सतारवादक प्रसाद रहाणे यांनी कलारंगच्या मैफलीत साधत कलारंगाच्या मैफलीचा समारोप केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय ओझरकर, स्नेहल एकबोटे, गणेश शिंदे यांनी परिश्रम घेतले.
‘कजरी’ची अनोखी अनुभूती!
मैफलीच्या प्रारंभी सादर केलेल्या मेघ रागाने प्रारंभीच पुढील सुरांच्या बरसातीचे संकेत दिले होते. त्यानंतर मिश्र पिलू रागातील कजरी रसिकांना भावली. वर्षाऋतूतील आल्हाददायक वातावरणाची अनुभूती कजरीमध्ये करण्यात येते. म्हणूनच कजरी ऐकतानाच जणू जलधारांमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद सर्व रसिकांना मिळत होता.
फोटो
२०प्रसाद रहाणे