नांदूरशिंगोटे : हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. नांदूरशिंगोटेसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणीने वेग घेतला असून, त्यामुळे येथील उपबाजारात कांद्याची आवक वाढली होती. तालुक्यात अनेक ठिकाणी पिके सोंगणीला वेग आला आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे. राज्यात व जिल्ह्यातील इतर ठिकाणी तीन दिवस ढगाळ वातावरणासह पाऊस तसेच काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक शेतकरी पिकांच्या सोंगणीच्या तयारीला लागले आहेत. सध्या तालुक्यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा ही पिके काढणीला आली आहेत. काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, वातावरणातील आर्द्रता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांच्या सोंगणीच्या कामांनी वेग घेतला आहे. काही ठिकाणी हार्वेस्टरच्या सहाय्याने गव्हाची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी हरभरा, कांदा काढणीची कामे सुरु आहेत.
----------------------
हवामानात बदल, मजुरांची टंचाई
हवामानातील बदलामुळे एकाचवेळी काढणीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे तसेच मजुरीचे भावही वाढले आहेत. यंदा हार्वेस्टरचे भाव एकरी दोन हजारांवर गेले आहेत. मजूरही अडीच ते तीन हजार रुपये एकरी भाव सांगत आहेत. शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने त्यांना मोठा भुर्दंड बसत आहे. कांदा काढणीसाठी शेतकरी तसेच मजुरांची लगबग दिसत आहे. काढलेला कांदा साठविण्यासाठी कांदा शेडवर पानकागद टाकणे तसेच डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
----------------------
विक्रमी आवक
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजार आवारात कांद्याची विक्रमी चौदा हजार २८० क्विंटल आवक झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे. लाल व उन्हाळ अशा दोन्ही कांद्यांची आवक बाजारात झाली आहे. लाल व गावठी कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १,००० ते १,१०० रुपये दर मिळाला.