ओतूर : परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण व त्यामुळे वाढलेली उष्णता यामुळे उन्हाळ कांदा रोपांना फटका बसत आहे.
गेल्या महिन्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने आपल्या घरातील उन्हाळ कांद्याची रोपे शेतकऱ्यांनी टाकली ती पूर्ण वाया गेली. ते नुकसान भरून निघाले नाही. नंतर शेतकऱ्यांनी नगर जिल्ह्यातून महागडी बियाणे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आणून पेरणी केली; परंतु बेभरवशाचे, भेसळ बियाणे पन्नास टक्केच उगवले. त्यानंतर ढगाळ हवामान असल्याने रोपे मर धरू लागली. अनेक औषधांची फवारणी करूनही रोपे सुधारत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरून महागडी रोपे विकत आणून लागवड पूर्ण करावी लागणार आहे. एकतर मागील वर्षाचा शिल्लक कांद्यास भाव नाही त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला. याहीवर्षी शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे.