नाशिक : ऑक्सिजन गळती आणि त्यामुळे रुग्णांचे झालेले मृत्यू हे केवळ अपघातामुळे झाले आहेत. त्यामुळे मनोधैर्य खचून न देता काम करा, असा सल्ला देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले आहे. महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेत एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथे जोखीम करून काम करणाऱ्यांनादेखील धक्का बसला आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि. २४) या रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हा अपघात असून त्या घटनेने मनोधैर्य खचून न देता आपण आतापर्यंत यशस्वीरीत्या जी जबाबदारी पार पाडत आहात तशी जबाबदारी पार पाडण्याचे कार्य पुढे सुरू ठेवावे. तसेच या ठिकाणी व शहरातील शासकीय खासगी इमारतींचे फायर ऑडिट, स्ट्रक्चरल, इलेक्ट्रिकल ऑडिट, एअर कुलरबाबतचे ऑडिट, पावसाळा व वादळवारे यादृष्टीने ऑडिट करून घेण्याच्या सूचनादेखील या वेळी दिल्या.
या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मनपाचे कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे डॉ. नितीन रावते, डॉ. अनिता हिरे, डॉ. किरण शिंदे, विशाल बेडसे, मेट्रन संध्या सावंत, फार्मासिस्ट टिकाराम गांगुर्डे, सिस्टर नानजर, हॉस्पिटल मॅनेजर विशाल कडाळे यांच्याशी संवाद साधला. या वेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, आशिष सिंग, डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.