नाशिक : जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे, रेमडेसिविर पुरेसे मिळत नाहीत, बेड प्रचंड वाढवूनही अपुरे पडत आहेत ही परिस्थिती आहे. तरीदेखील नागरिक जीवनावश्यकच्या नावाखाली बाहेर फिरत असून कुठेही ब्रेक द चेन होताना दिसत नाही. एकूणच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे यापेक्षाही अधिक कठोर पाऊल म्हणजे कदाचित पूर्ण लॉकडाऊनचे पाऊलही उचलावे लागणार आहे. मात्र, त्याबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवले असून तो निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिकमधील कोरोना परिस्थितीचा शनिवारी (दि.१७) आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक गैरफायदा घेत मोकाट फिरत असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे नाशिकमध्ये पूर्णपणे लाॅकडाऊनची मागणी करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील भाजपा आमदार, आमच्या आघाडीतील आमदारांनीदेखील लॉकडाऊन लावा अशीच मागणी केली असून व्यापारी, किराणा दुकानदार यांनीदेखील लाॅकडाऊनला पाठिंबा दर्शवला असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील, असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लाॅकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले.
इन्फो
ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा
शहरात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याचे नाकारता येत नाही. सद्यस्थितीत १३९ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून फक्त ८७ टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता हा तुटवडा वाढतच जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनीच संयम बाळगून स्वत:ची काळजी घेण्याची गरज असल्याचे भुजबळ म्हणाले.
मागणी १० हजारांची मिळतात ५००
रेमडेसिविरसारख्या औषधाची मागणी जिल्ह्यात सध्या १० हजार असून इथे दिवसाला ५०० किंवा ६०० मिळत असल्याने त्या औषधांचादेखील तुटवडा आहे. मात्र, ते औषध असेल तरच जीव वाचतो, असे नसून त्या औषधाने केवळ लवकर बरे होता येते. त्याशिवायची अन्य औषधे वापरुनही रुग्ण बरे होत आहेत. रेमडिसिविर तयार करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधून मागणी नोंदविली असून २० एप्रिलनंतरच रेमडेसिविर त्यांच्याकडून अधिक प्रमाणात उपलब्ध होऊ शकणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
वेगाने प्रसारात नाशिक तिसऱ्या स्थानी
अत्यंत वेगाने कोरोना फैलावत असलेल्या देशातील शहरांमध्ये नाशिक पहिल्या नव्हे, तर तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानी आहे. मात्र, ही परिस्थितीदेखील वाईटच असून त्यामुळेच गत १५ दिवसांत आपण २ हजार बेड वाढविले आहेत. त्यामुळे आता आणखी प्रसार व्हायला नको, असल्याने कुंभमेळ्यावरून आलेल्या नागरिकांनी त्वरित टेस्ट करून घ्यावी असेही त्यांनी सांगितले.