नाशिक : केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा होणार असून, येत्या तीन महिन्यांत शहरात सुमारे चाळीस ते पन्नास सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहेत. औद्योगिक भागाला आणि घरातील एलपीजी गॅसला स्वस्त पर्याय ठरू शकणारा घरगुती गॅसदेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (दि.२२) दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथून करणार आहेत. महाराष्टÑ नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने बुधवारी (दि.२१) पत्रकार परिषदेत ही माहिती स्वतंत्र संचालक राजेश पांडे तसेच व्यवस्थापकीय संचालक ए. एम. तांबेकर यांनी दिली. यावेळी सुजीत रूईकर, मयूरेश गानू, सचिन काळे आदी अधिकारी उपस्थित होते.देशातील पारंपरिक क्रुड आॅइलचा वापर कमी व्हावा यासाठी स्वच्छ नैसर्गिक गॅसला प्रोत्साहन देण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून नवव्या टप्प्यात १७४ शहरात सीएनजी गॅस वितरण सुरू करण्यात येणार आहे. महाराष्टÑ नॅचरल गॅसच्या माध्यमातून नाशिक, धुळे आणि औरंगाबाद येथे आता गॅस पुरवठा केला जाणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी सर्वेक्षण सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणी सुरू होईल. नाशिकसाठी पालघर येथून शंभर किलोमीटर गॅसवाहिनी टाकण्यात येणार असून, हे काम दोन वर्षांत पूर्ण होईल; परंतु तत्पूर्वी नाशिक शहरात चाळीस ते पन्नास ठिकाणी सीएनजी पंप सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी टॅँकरने गॅस पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांतच मोटारींसाठी सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे.देशभरात दीड हजार सीएनजी पंप असून, ३२ लाख वाहने त्यावर चालतात. याशिवाय घरगुती गॅस पुरवठ्यासाठी थेट पाइपलाइनचा वापर केला जातो आणि गॅसमीटरच्या माध्यमातून बिलिंग केले जाते. घरगुती गॅसवर जनरेटर आणि एसीदेखील चालविला जातो. उद्योग आणि रिक्षासारख्या वाहनांसाठीदेखील हा स्वस्तातील पर्याय आहे.पेट्रोलपेक्षा स्वस्तसध्या पेट्रोल आणि डिझेल महाग होत चालले आहे. त्यामुळे इंधन वापराबाबत अडचण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सीएनजीचा स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत ३५ टक्के हे इंधन स्वस्त आहे. शिवाय पर्यावरणपूरक असून, वाहनांना जादा माईलेज मिळतो. घरगुती गॅसदेखील स्वस्त असून, अनुदानीत सिलिंडर साडेपाचशे रुपयांपर्यंत जाते तर सीएनजी साडेतीनशे रुपयांत पडतो.
नाशिक शहरात आता सीएनजी गॅस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:09 AM