इंदिरानगर : केंद्र सरकारच्या पुढाकाराने शहरात स्वस्त आणि पर्यावरणपूरक असलेल्या सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीतील सीएनजी गॅस कंपनीच्या वतीने इंदिरानगर परिसरापासून सर्वेक्षणला सुरुवात करण्यात आली आहे.महापालिका हद्दीतील इंदिरानगर परिसरात दोन दिवसांपासून सीएनजी कंपनीद्वारे परिसरात सर्व्हेला सुरुवात करण्यात आली. या सर्व्हेमध्ये गुगलद्वारे व नकाशा पाहून सोसायटी, अपार्टमेंट व कॉलनी परिसरात किती सदनिका व बंगले आहे याची पाहणी करण्याचे काम करण्यात येत आहे. सदर काम तीन कंपनीला देण्यात आले आहे त्यांचे कर्मचारी पाहणी करून त्याची नोंद करून पॉइंट ठरवत आहे तसेच घरगुती आणि व्यावसायिक असे दोन प्रकारचे सर्व्हे करण्यात येत आहे. त्यामध्ये वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेले सुमारे सात ते आठ प्रकल्प असून, त्या प्रत्येक प्रकल्पात सुमारे पाचशे ते सहाशे सदनिका असून, त्यांना गॅस जोडणीस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार गुरूकृपा सोसायटी, वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेले सुमारे दोन ते तीन मोठ्या प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत संपूर्ण नाशिक शहरातील सर्व्हे करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील सहा महिन्यांत गॅस जोडणीसाठी लागणारी पाइपलाइन सुमारे पाच ते सहा फूट खोदकाम करून टाकण्यात येणार आहे. त्यानंतर मागेल त्याला गॅस जोडणी पाइपलाइनद्वारे करण्यात येणार आहे.सध्या गॅस सिलिंडर १४ किलोचा सुमारे ९५० रुपयास मिळतो त्यातील सबसिडी संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यावर जमा होते. सीएनजी गॅस कंपनीद्वारे सुमारे १४ किलो गॅस सुमारे साडेतीनशे रुपयाला पडणार असल्याचे गॅस कंपनीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
शहरात ‘सीएनजी गॅस’चे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:27 AM