त्र्यंबकेश्वर : भारत जेव्हा इंधन समृद्ध देश होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महासत्ता बनेल, त्याकरिता प्रत्येकाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदूषणमुक्त राहाण्याचा सल्ला एमसीएल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर कार्तिक रावल यांनी येथे श्री पंचायती निरंजनी आखाड्यातर्फे होणाऱ्या गॅस प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी दिला.
मंगळवारी (दि.२३) अंबोली येथील बुवाची वाडी येथील आखाड्याच्या मोकळ्या जागेत या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा श्री त्र्यंबकेश्वर षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, शंकरानंद सरस्वती ऊर्फ भगवान बाबा, पंचायती श्रीनिरंजनी आखाड्याचे सचिव महंत दिनेशगिरी, बेझे येथील श्रीराम शक्तिपीठाचे प्रमुख निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर श्रीस्वामी सोमेश्वरानंद, धनंजय गिरी, महंत केशवपुरी आदी मान्यवर संत-महंत या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते.
येथील श्री पंचायती आखाडा निरंजनीतर्फे मीरा क्लिनफ्युल्स लिमिटेडतर्फे पंचायती श्रीनिरंजनी आखाडा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, बुवाची वाडी येथे बायो-सीएनजी व बायो-पीएनजी प्रकल्प साकारत आहे. त्यासाठी १० रुपये भरून सभासद व्हावे. कंपनीने दिलेल्या हत्ती गवताची लागवड करून त्यापासून बायो सीएनजी, बायो पीएनजी गॅसचे निर्मिती होऊ शकेल. याबरोबरच नगरपरिषदेचा कचराही कंपनीत जमा करून बायोगॅसची निर्मिती होऊ शकेल. जेणेकरून त्र्यंबकेश्वर शहर प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक होईल, असे रावल म्हणाले.
यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, सचिन कुऱ्हाडे, अरुण मेढे, समाधान बोडके, राजू घुले, स्वाती पवार, शारदा तुंगार, संजय चव्हाण, रामचंद्र बदादे, न. ग. डगळे, ऋषभ पवार, ज्ञानेश्वर मेढे, सुरेश मालुंजकर, सूरज बामणे, मनोहर उदार, सुशांत तुंगार, दीपक मिंदे, सचिन तिदमे, पोपट गुंबाडे, धनंजय महाले आदी उपस्थित होते.
दरम्यान, हा प्रकल्प सुरू झाल्यास दररोज एक लाख लिटर गॅसचे उत्पादन होऊ शकेल. तसेच सुमारे २००० लोकांना रोजगार मिळू शकेल, अशी माहिती देण्यात आली.
(२३ त्र्यंबक गॅस १,२,३)