गेल्या महिनाभरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचेही दर वाढले आहेत. यात पेट्रोल १०.४५ रुपये, तर डिझेल १०.३५ रुपये प्रति लिटरला महागले आहे. तसेच सीएनजीच्या किमतीतही ४.४ रुपयांची वाढ झाली असून सध्या सीएनजी ६७.९ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी या राज्यांमधील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे.
महिनाभरात किती ही महागाई?
पेट्रोलची ८.६४ टक्के वाढ
पाच महिन्यांपूर्वी ११०.४२ रुपये प्रति लिटर असलेल्या पेट्रोलच्या किमती २२ एप्रिलपासून १२०.८७ रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. ही दरवाढ सुमारे ८.६४ टक्के आहे.
डिझेल ९.९९ टक्के वाढले
पाच महिन्यांपूर्वी ९३.१९ रुपये प्रति लिटर असलेले डिझेल मागील पंधरवड्यात तब्बल १०.३५ रुपयांनी महागले. ही दरवाढ सुमारे ९.९९ टक्के आहे.
सीएनजीत ६.४८ टक्के वाढ
मागील महिनाभरात सीएनजीच्या किमतीमध्येही प्रति किलो ६३.५ रुपयांवरून ६७.९ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. ही दरवाढ सुमारे ६.४८ टक्के एवढी आहे.
कोणती वाहने किती?
पेट्रोल - २८९४८०
डिझेल - १६४३७०
सीएनजी - ५४७२०
रिक्षा, टॅक्सीही महाग
पेट्रोल, डिझेलसह सीएनजीचेही दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम प्रवासी भाडेवाढीवर झाला आहे. वारंवार इंधन दरवाढ होत असल्याने रिक्षा, टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अधिक भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे.
निवडणुका संपताच १४ वेळा दरवाढ
देशात पेट्रोल व डिझेलचे दर नियंत्रणमुक्त असले तरी, पाच राज्यांच्या निवडणुका संपताच इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. निवडणुका संपल्यानंतर आतापर्यंत तब्बल १४ वेळा दरवाढ केली आहे.
गाड्या पार्किंगलाच उभ्या कराव्या लागणार
दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत असल्याने चार मित्र शेअरिंगमध्ये कारचा वापर करू लागले आहेत. अशीच दरवाढ होत राहिली, तर गाड्या पार्किंगमध्येच उभ्या राहतील.
- संदीप कोलते, वाहनचालक
नोकरी व इतर अत्यावश्यक कामासाठी पेट्रोल भरावेच लागते. वाहन घराबाहेर काढण्याची इच्छाच होत नाही. त्यासाठी सामान्य वर्गाचे उत्पन्नही वाढले पाहिजे.
-अनील पगारे, वाहनचालक