नाशिकरोड : मनपा हद्दीतील मिळकती व शेतजमिनी यांना लागू केलेली दरवाढ ही अन्यायकारक असून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे दरवाढ मागे घेण्यास तयार नाही. यामुळे मनपा आयुक्तांवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला विविध संस्थांचा पाठिंबा असल्याचे पत्र देत शहर परिसरातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थादेखील पुढे सरसावल्या आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ केल्याने त्या विरोधात मोठा लढा उभा राहिला आहे. बंगले, सोसायटीचे सामासिक अंतर, मोकळी जागा, जिना, शेतजमिनी, खुले प्लॉट, एनए प्लॉट यांना मोठ्या प्रमाणात करवाढ केल्याने आयुक्त विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष उभा ठाकला आहे. महापौर यांच्या नावाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संस्थेच्या कार्य क्षेत्रातील सभासदांच्या मनपा हद्दीतील शेतजमिनी व मिळकतीवर मनपाने अन्यायकारक करवाढ केली आहे. करवाढ रद्द करण्याची मनपा आयुक्तांची सहकार्याची भूमिका नसल्याने त्यांच्या बदलीसंदर्भात व मनपामध्ये दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला आमच्या संस्थेचा पाठिंबा असल्याचे पत्रात म्हटले आहे. शहरातील बहुतांश विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थांनी अशा प्रकारचे पत्र दिले आहे. पालकमंत्र्यांना सदरची पत्रे दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.तीव्र नाराजीमुंढे यांच्या काही निर्णयामुळे व दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र आता यामध्ये शहरातील बहुतांश विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थांनीदेखील उडी घेतली आहे.
सहकारी संस्थाही मुंढे यांच्या विरोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:27 AM