नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना मतदानाचे काम दिल्याने महापालिकेत अनेक महत्त्वाच्या जागी सफाई कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या या कर्मचाऱ्यांची पिळवणूकच झाली आहे. बुधवारी झालेल्या मतदानासाठी महापालिकेतील जवळपास निम्म्याहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रांवर नियुक्ती झाली होती. त्यामुळे महापालिकेतील विविध विभागांत जबाबदारीच्या जागी शिक्षित स्वच्छता कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. परिणामी अनेक कॅश काउंटरवरही तीन दिवसांसाठी या कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली होती. असे करताना त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे लेखी आदेश न काढताही विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे हा पदभार दिल्याने त्याबद्दल चर्चा होते आहे. मेनरोड, इंदिरानगर आणि सिडकोसह काही भागांत अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली होती. ही जबाबदारी देतानाही शिक्षित स्वच्छता कर्मचाऱ्यांना बळजबरीने जबाबदारी दिल्याने त्यांच्यात नाराजी आहे. कारण दररोज जमा होणारी रोख रक्कम लाखो रुपयांच्या पटीत असल्याने त्यात फरक पडल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न होता. हिशेबात काही घोळ झाल्यास त्याचा फटका या कर्मचाऱ्यांना बसतो, तर दुसरीकडे अतिरिक्त कारभाराचा मोबदलाही त्यांना दिला जात नाही. इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मात्र दहा टक्के अतिरिक्त वेतन दिले जाते. त्यामुळे अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा, अशी मागणी या कर्मचाऱ्यांकडून होते आहे. यामुळे सुशिक्षित स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये मात्र पिळवणूक होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
सुशिक्षित सफाई कर्मचाऱ्यांची पिळवणूक
By admin | Published: October 16, 2014 9:27 PM