एकलहरे : येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच अर्थ नसल्याचे जाणकारांचे म्हणणे असून, एकलहरे प्रकल्पाच्या वीजनिर्मितीत ज्या अडचणी आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने रतन इंडिया कंपनीसाठीही अधिक अडचणींचा डोंगर असल्यामुळे तोंड पोळलेल्या महानिर्मितीकडून अशा प्रकारचा निर्णय होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. महानिर्मितीला कोळसा टंचाईचे ग्रहण नवीन नाही. त्यामुळे सध्या एकलहरे वीजनिर्मिती केंद्राला दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. केंद्राला दररोज सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी संच ३ व ४ सुरळीत सुरू आहेत, तर एक संच स्टँडबाय ठेवलेला असतो. सध्या दोन्ही संचांमधून १९०-१९५ मेगावॉट वीज उत्पादन सुरू आहे. केंद्राला लागणाऱ्या कोळशाबाबत शेड्यूल ठरविण्यात आलेले असून, दोन दिवसांचा कोळसा शिल्लक असल्यास पुढच्या दोन दिवसांसाठी लागणारा कोळसा वाहतुकीत आॅन द वे असतो. त्यामुळे केंद्राला वेळेत कोळशाचा पुरवठा होईल असे व्यवस्थापनाचे म्हणणे असले तरी, एकलहरेच्या एका संचाचा कोळसा पुरविण्याचा ठेका घेतलेल्या धारिवाल कंपनीचा करार आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आला असून, त्यामुळे नवीन करार केला किंवा नाही याचा उलगडा होत नाही. तथापि, देशातील प्रत्येक वीजनिर्मिती केंद्राची वाटचाल एकलहरे केंद्राच्या बरोबरीने आजवर झालेली असल्याने त्यात नवीन काहीच नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत एकलहरे बंद करून त्या ऐवजी रतन इंडियाचा वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी सुरू झालेल्या चर्चेतही फारसे तथ्य नसल्याचे जाणवत आहे. एकलहरे प्रमाणेच रतन इंडियाचा प्रकल्प असून, या प्रकल्पाला कोळसा वाहतुकीची साधने नसल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. तसेच शासन त्यांच्याकडून वीज विकत घेईलच, याची कोणतीच शाश्वती नाही. कोळशाप्रमाणेच दळणवळण, रस्ता, पाणी व विजेची मागणी करणारे उद्योग याची रतन इंडियाला मोठी गरज आहे. आजच्या घडीला रतन इंडियासमोर ह्याच मोठ्या अडचणी उभ्या असून, त्या सोडविल्या जातील याबाबत साशंकता आहे. अशा परिस्थितीत सेट झालेला एकलहरेचा प्रकल्प बंद करून त्याऐवजी रतन इंडियाच्या पाठीमागे महानिर्मिती धावेल यावर कोणीच विश्वास ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे एकलहरेच्या प्रकल्पाबाबत कर्मचाºयांच्या मनात भीती घालविण्याबरोबरच रतन इंडियाच्या प्रकल्पात खीळ घालण्यामागे राजकारण असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.संचाची दुरुस्ती केल्यास खर्च कमी होईलएकलहरे केंद्रात सध्या आहे त्या संचांची दुरुस्ती व अद्ययावतीकरण केल्यास संचाचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढेल व रतन इंडियापेक्षा खर्चही कमी होईल. दरम्यानच्या काळात नवीन ६६० चा प्रकल्प किंवा २५० चे तीन संच एकलहरेसाठी द्यावेत अशी कर्मचाºयांची मागणी असून, तसे झाल्यास वीजनिर्मितीची उत्पादन क्षमता वाढीस लागून खर्चातही कपात होण्याचा दावा केला जात आहे.
एकलहरेत दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:10 AM