नाशिक : टाकळीरोड परिसरातील एका अशोकाच्या झाडावरील नायलॉन मांजाच्या जाळ्यात सुमधुर कंठाची नैसर्गिक देणगी लाभलेली कोकिळा अडकून जायबंदी झाली होती. परंतु पक्षीप्रेमींच्या अथक प्रयत्नानंतर या कोकीळ पक्षाची मांजाच्या फासामधून सुटका करण्यात आली. नायलॉन मांजाचा फास पंखांना बसल्यामुळे तिला भरारी घेता येणे शक्य होत नसल्याने मांजाला कोकिळा उलटी लटकली होती. यावेळी तिचा सुमधुर वाटणारा आवाज काहीसा आक्रमक होऊन झाडाखाली असलेल्या गॅरेज व्यावसायिकांच्या कानी पडल्याने त्यांचे लक्ष वेधले गेले. माणुसकीच्या नात्याने त्यांनीही तत्काळ प्रसंगावधान दाखविले. सुभाष कुमावत यांनी त्वरित लोखंडी गजाच्या सहाय्याने कोकिळेची मांजाच्या फासातून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांना काही वेळातच यश आले आणि त्यांनी अलगद कोकिळेला खाली उतरविले. त्यानंतर कात्रीच्या सहाय्याने तिच्या पंखांभोवती आवळलेला मांजाचा फास हळुवारपणे सोडविला. नायलॉन मांजामुळे पंखांना काही प्रमाणात इजा पोहचली होती. अल्पावधीत कोकिळेने पाण्याचा घोट घेत पुन्हा आकाशात भरारी घेतली. कुमावत यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने एका मुक्या पक्ष्याचा जीव वाचला. आणि सर्वांनाच समाधान वाटले.
कोकीळ पक्ष्याला बसला मांजाचा फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 12:11 AM