शहरात वाढलेली थंडी आता पुन्हा गायब झाली आहे. कमाल-किमान तापमानात मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढ होऊ लागल्याने, नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात मागील आठवड्यात किमान तापमानाचा पारा थेट ९.१ अंशापर्यंत घसरला होता, तसेच कमाल तापमानही २८ अंशांपर्यंत खाली आले होते. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहावयास मिळत होत्या. नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून ठेवणे पसंत करत होते. मात्र सध्या परिस्थिती बदलली असून, हवामानात उष्मा जाणवू लागल्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर आता थांबविला आहे. पहाटे काही प्रमाणात सूर्योदय होईपर्यंत थंडी जाणवते. त्यानंतर, वातावरणात गारवा हळूहळू कमी होत जातो. संध्याकाळी हवेत गारवा मागील तीन दिवसांपासून फारसा जाणवत नसून, रात्री अकरा वाजल्यापासून पुढे काही प्रमाणात वातावरणात गारवा जाणवतो. एकूणच उकाडा वाढू लागल्याने नाशिककरांना आता उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातून थंडी गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:17 AM