नोव्हेंबरच्या सुरुवातीला १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेल्या किमान तापमानात चक्रीवादळामुळे पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली होती. यामुळे गुलाबी थंडीचा अनुभव नाशिककरांना फार काही दिवस घेता आला नाही. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून शहरात उकाड्याचा अनुभव नागरिकांना आला. कमाल तापमानाचा पारा ३१अंशापर्यंत चढला होता. त्यामुळे नागरिकांना थंडीचा ऋतू सुरू होऊनही न झाल्यासारखा वाटत होता. हवामान खात्याकडून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून किमान तापमानाचा पारा वेगाने घसरून थंडीची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यानुसार शनिवारी पारा अचानक ११ अंशावर आला आणि नाशिककरांना थंडीचा प्रचंड कडाका जाणवला. निफाडला ११ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले. पुढील आठवड्यात थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तविला आहे. राज्यात शनिवारी सर्वाधिक थंडीची गोंदिया, परभणीमध्ये नोंद झाली.
--इन्फो--
एका दिवसात चार अंशांची घसरण
गुरुवारी शहराचे किमान तापमान १३, तर शुक्रवारी १४ अंश सेल्सिअसच्या इतके नोंदविले गेले होते; मात्र शनिवारी पारा थेट चार अंशांनी खाली आला. यावरून पुढील काही दिवसांत शहरात पाच अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होऊ शकते, असे हवामान केंद्राच्या सूत्रांनी सांगितले.
---इन्फो---
या शहरांमध्ये थंडीचा कडाका (कंसात किमान तापमान)
गोंदिया (१०.५)
परभणी (१०.६)
नाशिक (११.१)
पुणे (११.५)
औरंगाबाद (९१३)
अकोला (१३.१)
सातारा (१३.३)
महाबळेश्वर (१४.३)