अनधिकृत बांधकाम ; आयुक्तांना निवेदन
मालेगाव : शहरातील संगमेश्वरातील सर्व्हे नं. ३२९/१/२ ते १० येथे २ हजार चौरस मीटर जागा उद्यानासाठी राखीव असताना माजी नगरसेवक गुलाब पगारे हे ही जागा स्वत:च्या मालकीची सांगून या ठिकाणी शौचालय व घराचे पक्के बांधकाम केले आहे. जवळच इंग्लिश मीडियम स्कूल व काबरा शाळा असून लग्नकार्यासाठी वाजंत्री वाजत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे. नगरसेवकांनी आपल्या निधीचा गैरवापर केला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगावात नाट्यगृह उभारण्याची मागणी
मालेगाव : शहरात मोठ्या संख्येने नाट्यरसिक असून त्यांना नाटक पाहण्यासाठी नाशिकसह मोठ्या शहरात जावे लागते. महापालिकेने शहरात अद्ययावत असे नाट्यगृह उभारल्यास नागरिकांची सांस्कृतिक कार्यक्रमांची सोय होऊ शकेल. शिवाय दर्जेदार नाटके मालेगावात येऊ शकतील. महापालिकेतर्फे नाट्यगृह उभारल्यास त्यात विविध संमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी भाड्याने दिल्यास मनपाला आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
औद्योगिक वसाहतीकडून रोजगाराच्या आशा
मालेगाव : शहरातील अजंग, रावळगाव औद्योगिक वसाहतीत ८६३ एकर जमिनीवर विविध उद्योग, व्यवसाय सुरू करण्यात येणार असून यातून शहरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. शहरात मोठ्या संख्येने कुशल व अकुशल कामगार असून त्यांना संधी मिळत नसल्याने नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागते. औद्याेगिक वसाहतीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. कृषिमंत्री भुसे यांनी औद्योगिक वसाहतीत मोठ-मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
शेतकरी संघाच्या चेअरमनपदी देवरे
मालेगाव : येथील शेतकरी सहकारी संघ लि. मालेगावच्या चेअरमनपदी संदीप पोपटराव देवरे यांची तर व्हा. चेअरमनपदी जीवन माधवराव गरूड यांची निवड करण्यात आली. अद्वय हिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समाधान हिरे, विठोबा छरंग, नंदू शिरोळे, दादा अहिरे, दारासिंग तुंवर, भूषण गोलाईत, संदीप देवरे, प्रवीण हिरे, नंदलाल निकम, भाऊसाहेब देवरे, मंगला निकम, जीवन गरूड, मनिषा हिरे आदी संचालक उपस्थित होते. चेअरमन विठोबा छरंग व व्हा. चेअरमन भाऊसाहेब देवरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांनी काम पाहिले.