उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह विदर्भही गारठण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी नाशकात ९.१ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. मागील चार दिवसांपासून नाशिक शहराचे वातावरण कमालीचे थंड झाल्याने ‘वाइन कॅपिटल’ सध्या राज्यातील ‘कूल सिटी’ बनल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे.
शहराचे किमान तापमान रविवारी १० अंशांपर्यंत घसरले होते. यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली. मंगळवारीसुद्धा पारा घसरल्यामुळे थंडीत अधिकच वाढ झाल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे. पहाटे थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले. पहाटेपासून सूर्योदयापर्यंत शहराने धुक्याची दुलई पांघरलेली होती. त्यामुळे सकाळी नाशिककरांना जणू आपण महाबळेश्वर, कुलू मनाली किंवा माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी तर नाही ना, असा प्रश्न पडला होता. सकाळी नाशिककरांनी थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्याचेही दिसून आले. बुधवारी किमान तापमानात काही अंशी वाढ झाली. तसेच कमाल तापमानाचाही पारा २८ अंशावरून थेट ३१ अंशापर्यंत पोहचल्याने नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
-- इन्फो---
मागील वर्षाच्या तुलनेत थंडी कमीच
मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा प्रकोप तसा बघितला तर कमीच असल्याचे दिसून येते. हंगामात नववर्षाच्या प्रारंभी २३ डिसेंबर रोजी ८.२ अंशांपर्यंत तापमान घसरले होते, ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली होती.