सिन्नर : शहरासह तालुक्यात थंडीची लाट पसरली असून थंडीपासून बचावासाठी गरम कपड्यांसह शेकोटीचादेखील आधार घेतला जात आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या दिसून येत आहे.नाशिक जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. तालुक्यात बुधवारी (दि.२६) रोजी ७ अंश, गुरूवारी व शुक्रवारी ६ अंशावर पारा खाली आल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात यंदा हिवाळ्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी पडू लागली. परंतु, ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाल्याने थंडीची तीव्रता कमी जाणवत होती. जवळपास दहा ते पंधरा दिवसानंतर पुन्हा थंडीत वाढ झाली आहे. तालुक्यातील कमाल तापमानाची नोंद शुक्रवार कमाल २५ अंश तर किमान ६ अंश तापमानाची नोंद झाली. हे तापमान आणखी खाली येण्याचा अंदाज वर्तविला जात असून, थंडीच्या कडाक्यापासून बचावासाठी शेकोट्या पेटावल्या जात आहेत. तालुक्यात मागील चार दिवसांपासून वातावरणात जास्त गारवा निर्माण झाला आहे. हवामान खात्याने थंडीचा कडाका आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. दिवसभर गार वारे वाहत असल्याचे चित्र आहे. वाढती थंडी पाहता बाजारपेठेत उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.
सिन्नर शहर व तालुक्यात थंडीचा जोर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 5:45 PM