नाशिक: शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून नाशिककरांना पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग अधिक वाढल्यामुळे विदर्भासह आता उत्तर महाराष्ट्रही गारठण्यास सुरुवात झाली आहे.शहरात मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून पारा चढ-उतार होत आहे. गुरुवारी (दि.४) तापमान ११.८ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमान ३१.३, तर किमान तापमान १३ अंशांपर्यंत वर सरकले; मात्र दोनच दिवसांत अचानक या दोन्ही तापमानात वेगाने घसरण झाली. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरले. ३१ अंशावरून थेट २८.३ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने नाशिककरांना रविवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. शनिवारी रात्री नऊ वाजेपासूनच शहर व परिसरात थंड वारे वेगाने वाहू लागले होते. यामुळे नाशिककरांना शनिवारी रात्रीपासूनच थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली.
रात्री आकाश निरभ्र राहिल्याने पारा वेगाने घसरला आणि रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात १० अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वात नीचांकी तापमान नाशिकमध्ये असल्याने नाशकात थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवला.