नाशिक शहरात शनिवारी दिवसभर ढग दाटून आलेले होते. संध्याकाळी व रात्री बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रविवारी संध्याकाळपासून अचानकपणे थंडीची तीव्रता वाढली. किमान तापमान वेगाने खाली आले आणि सोमवारी पहाटेपर्यंत ७.३ अंश सेल्सिअस इतकी नीचांकी नोंद झाली. शनिवारी झालेल्या बेमोसमी पावसानंतर वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आणि नाशिककरांना हुडहुडी भरली.
सोमवारी दिवसभर वातावरणात गारवा टिकून राहिला. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांच्या वापरास प्राधान्य दिले. सूर्यास्त होताच पुन्हा शीतलहरींचा प्रभाव अधिक तीव्र होत गेला आणि रात्री आठ वाजेपर्यंत नाशिककर थंडीने गारठले. सोमवारी पहाटे जॉगिंग ट्रॅक परिसरात फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही रोडावल्याचे दिसून आले.
गोदाकाठी तसेच बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये नागरिकांनी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला. रात्री ९ वाजेपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
उत्तरेकडून शीतलहरींचा प्रवास पुन्हा वेगाने सुरू झाल्याने पारा वेगाने घसरणार असून आगामी काही दिवसांत थंडीचा कडाका अधिक वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शीतलहरींचा वेग ४ ते १० किमी प्रतितास
नाशिकमध्ये सोमवारी ४ ते १० किमी प्रतितास इतक्या वेगाने शीतलहरी वाहत होत्या. रात्री पुन्हा वेग वाढल्याने थंडीचा कडाका पहाटेपर्यंत अधिक वाढला होता. त्यामुळे नाशिककर गारठून गेले.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान असे
मुंबई-कुलाबा- १५.२
पुणे- १२.०
जळगाव ९.०
कोल्हापूर १६.०
महाबळेश्वर - १०.४
मालेगाव १०.२
नाशिक ७.३
सांगली १५.९
सातारा १५.०
सोलापूर १६.७
औरंगाबाद ११.०
नागपूर- १८.३
अकोला-१५.५
अमरावती १५.१
बुलडाणा १२.६