त्र्यंबकेश्वर : आज सायंकाळी सहाच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून पिंपळदकडे जाणाऱ्या दुचाकी घसरून झालेल्या अपघात एक जण ठार, तर एक गंभीर झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात दोघांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने दुचाकीचालक नामदेव जिवला खेडुलकर हा जागीच ठार झाला, तर मागे बसलेला समाधान नामदेव पोटिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्यास नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वरहून आपल्या घरी पिंपळद (त्र्यंबक) येथे दोघेजण आपल्या दुचाकीवर (क्रमांक अजून निष्पन्न झाला नाही) जात होते. चालक नामदेव जिवला खेडुलकर (२५), मूळ रा. वाघेरा, ह.मु. पिंपळद (त्र्यंबक) व पाठीमागे बसलेला समाधान नामदेव पोटिंदे (२४), रा. पिंपळद (त्र्यंबक) हे दोघे जण घरी जात असताना दुचाकी घसरून मोरीवर आदळली. सायंकाळी ६ च्या दरम्यान आखाड्यासमोर ही घटना घडली. दोघांनाही त्र्यंबकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. भागवत लोंढे यांनी खेडुलकर हा जागेवरच मृत्यू पावल्याचे सांगितले, तर समाधान पोटिंदे याच्यावर प्राथमिक उपचार करून नाशिक येथे रुग्णालयाच्या अॅम्ब्युलन्समधून पाठविले. यावेळी जि. प. सदस्य संपत सकाळे त्वरित रुग्णालयात पोहचले व जखमी युवकाची विचारपूस केली. (वार्ताहर)
दुचाकी घसरून युवक ठार
By admin | Published: August 21, 2016 10:29 PM