नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा व आचारसंहिता लागू होताच जिल्हा परिषद प्रशासनाने उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली असून, सदरची वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात उभी करण्यात आली आहे.दुपारी १२ वाजता आचारसंहिता लागू झाल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ त्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांना व सदस्यांना दिली. त्यानुसार उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण सभापती यतिन पगार, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, बांधकाम सभापती मनीषा पवार यांना उपलब्ध करून दिलेले शासकीय वाहने जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार दुपारनंतर सदरचे वाहने जिल्हा परिषदेच्या आवारात उभी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांचे शासकीय वाहन गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत असल्याने ते खासगी वाहनाचा वापर करीत आहेत. त्यामुळे त्यांचे वाहन जमा करण्याचा प्रश्नच नाही, तर पंचायत समितीच्या पातळीवर सभापतींना शासकीय वाहन वापरण्याची मुभा शासन निर्णयानुसार देण्यात आली होती. आता मात्र आचारसंहिता जारी झाल्याने सभापतींना वाहन देऊ नये, अशा सूचना गट विकास अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची वाहने जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 1:57 AM