पंचवटी : गणेशोत्सव कालावधीत गणेश प्रतिष्ठापना केल्यानंतर घरगुती गणेश स्थापना करणारे काही भाविक दीड, पाच, सहा, सात दिवस गणपती प्रतिष्ठापना करून गणरायाचे विसर्जन करतात. यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गाचे विघ्न कायम असल्याने गणेश विसर्जनाच्या दिवशी विसर्जनस्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सव कालावधीत दीड, पाच, सहा व सात दिवस गणेशोत्सव साजरा करणाऱ्या घरगुती गणेश साजरा करणाऱ्या भाविकांनी श्रींना भक्तिमय वातावरणात निरोप देत पंचवटी महापालिकेकडे तब्बल एकवीसशे गणेशमूर्ती दान केल्या आहेत.
यंदा देशभरात कोरोना विषाणू संसर्ग कायम असल्याने
घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करणारे अनेक भाविक दरवर्षीप्रमाणे यंदा दहा दिवस गणेशोत्सव साजरा न करता दीड, पाच, सहा व सात दिवस गणेशमूर्ती घरात ठेवून विसर्जन करण्याची शक्यता पालिका प्रशासनाने वर्तविली होती. त्यानुसार पंचवटी बांधकाम व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत पंचवटीतील नैसर्गिक तलाव असलेल्या म्हसरूळ, तपोवन, रामकुंड, नांदूर, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर, म्हसोबा पटांगण आदी प्रत्येक ठिकाणी दहा दहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मनपा पंचवटी विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला आणि सात दिवसात तब्बल एकवीसशेहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
नदीपात्रात गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर पर्यावरणाला हानी पोहोचते. पर्यावरण टिकून राहावे यासाठी पंचवटी मनपाने गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आलेल्या शेकडो भाविकांकडून गणेशमूर्ती संकलन करून नैसर्गिक तलाव असलेल्या ठिकाणाहून तब्बल सात टन निर्माल्य जमा केले आहे. विशेष म्हणजे तपोवनात सर्वाधिक ६७७ तर त्यापाठोपाठ गौरी, म्हसोबा, टाळकुटेश्वर आणि रामकुंड, सीता सरोवर या भागात गणेशमूर्ती संकलन झाल्या आहेत.