नाशिक :रंगपंचमी म्हटली की, नाशिककरांच्या आनंदाला पारावार राहत नाही. सोमवारी (दि.२५) शहरभर नागरिकांचा अमाप उत्साह पहावयास मिळाला. डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईने रंगाने भरलेल्या पेशवेकालीन दहा ते पंधरा फूट खोल रहाडीमध्ये सामूहिक डुबकी लगावली. रहाड संस्कृती हे नाशिकच्या रंगपंचमीचे आगळेवेगळे पारंपरिक पेशवेकालीन वैशिष्ट्य मानले जाते.होळीचा सण बुधवारी पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला अन् त्यानंतर रंगपंचमीचा आनंद रहाडींच्या संगे लुटण्याची उत्सुकता ताणली गेली. कधी चार दिवस उलटतात अन् आठवड्याच्या पहिल्या दिवशी रंगात न्हाऊन निघण्याचे औचित्य साधता येते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. रंगपंचमीनिमित्त बाजारपेठेलाही भरते आले होते. तरुणाईसह आबालवृद्ध रंगांची उधळण करण्यासाठी सज्ज झाले होते. नाशिककर धूलिवंदनच्या मुहूर्तावर रंग उधळत नाही, तर रंगपंचमीला रहाडींच्या सोबतीने मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात रंगात न्हाऊन निघतात.सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेपासून शहरात रंगांच्या उधळणीला ठिकठिकाणी सुरुवात झाली होती. चौकाचौकांमध्ये डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. रंगपंचमीचा आनंद अन् उत्साह गावठाण परिसर म्हणून ओळख असलेल्या पंचवटी, जुने नाशिक भागात अधिक पहावयास मिळाला. या भागात पेशवेकालीन रहाडी अजूनही नाशिककरांनी जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे या रहाडींभोवती मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करीत रहाडीत डुबकी लगावणे पसंत केले. सगळे मतभेद बाजूला ठेवून एकाच रंगात रंगून नाशिककरांनी बंधुभाव जोपासण्याचा प्रयत्न यावेळी केला.रहाडींसोबतच ठिकठिकाणी विविध मित्रमंडळांसह संघटनांकडून चौकांमध्ये रंगाच्या पाण्याचे ‘शॉवर’लावून नृत्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने मेनरोड, गुलालवाडी व्यायामशाळा, साक्षी गणेश चौक, टाकसाळ लेन, भद्रकाली, पंचवटी, नाग चौक, काळाराम मंदिर परिसरासह आदी ठिकाणी नागरिकांनी शॉवरखाली भिजत विविध हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत नृत्य केले.
पेशवेकालीन रहाडीमध्ये सामूहिक डुबकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 6:50 PM
पंचवटी, जुने नाशिक भागात अधिक पहावयास मिळाला. या भागात पेशवेकालीन रहाडी अजूनही नाशिककरांनी जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे या रहाडींभोवती मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन जल्लोष करीत रहाडीत डुबकी लगावणे पसंत केले.
ठळक मुद्देरंगपंचमीचा आनंद अन् उत्साहरहाड संस्कृती हे नाशिकच्या रंगपंचमीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य