नाशिक : नाशिकचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. राज्य शासनाने बुधवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. त्यानुसार त्यांनी मावळते जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून पदभार घेतला. मांढरे यांची पुणे येथे राज्याच्या शिक्षण आयुक्तपदी बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाने बुधवारी राज्यातील नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यानुसार मंत्रालयात मुख्य सचिवांचे उपसचिव म्हणून कार्यरत असलेले गंगाथरन देवराजन यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. बदलीचे आदेश निघाल्यानंतर त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी मांढरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी मांढरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत पदभार सुपुर्द केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा सूचना व तंत्रज्ञान अधिकारी राजेश साळवे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, भीमराज दराडे, वासंत माळी, नितीन गावंडे, नीलेश श्रींगी, ज्योती कावरे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दौंडे, प्रशांत पवार, राजेंद्र नजन आदींसह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--इन्फो--
सोमवारी होणार स्वागत आणि निरोप समारंभ
नूतन जिल्हाधिकारी गंगाथरन यांनी गुरुवारी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला असला तरी सोमवारी (दि.१४) त्यांचे महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वागत केले जाणार आहे, तर सूरज मांढरे यांचा निरोप समारंभ होणार आहे. मांढरे हे उद्या पुणे येथे शिक्षण आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.