नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी दिला आहे. येत्या रविवारी परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मांढरे यांनी जाहीर केले.
काेरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात सायंकाळी सात वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळून बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबतचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर चिंता व्यक्त केली. सण, समारंभ तसेच बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांचे स्वैर वागणे सुरूच असल्याचे दिसून येते. नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन असेच होत राहिले तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे स्पष्ट संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
याबाबत मांढरे यांनी सांगितले की, मागील वर्षी कोरोनाशी लढत नाशिक जिल्हा सावरत असताना पुन्हा एकदा काेरोनाचे संकट उभे राहिले आहे. गतवर्षीपेक्षा वाईट अवस्थेत हा आजार समोर उभा असताना नागरिकांचे वागणे मात्र स्वैर झाल्याचे दिसत आहे. वास्तविक संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा सर्वांत सोपा आणि प्रभावी मार्ग असताना आपण जिल्ह्यात केवळ काही निर्बंध आणले आहेत. मागील लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेता नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्रही सुरू राहिले पाहिजे, या हेतूने केवळ गर्दी कमी करण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत; परंतु नागरिक त्यास अपेक्षित प्रतिसाद देताना दिसत नाहीत.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मृत्यूचा दर दोन टक्के असून तो अजूनही शून्यावर आलेला नाही. म्हणजे अडीच हजार रुग्णांमागे ५० रुग्णांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. नागरिक असेच बेजबाबदारपणे वागत राहिले तर प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.
--कोट--
संकट आपल्या कुटुंबावरही
कोराेना नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्या आदेशाचे पालन करणे सर्वांच्याच हिताचे आहे. आपल्या कुटुंबावरही संकट येऊ शकते याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कोरोनाचे संकट नियंत्रित करण्यासाठी संयम राखायला हवा. कुणीतरी येऊन कारवाई, दंड करील तेव्हाच आपण नियम पाळू, अशी मानसिकता न ठेवता आपण नियमांचे पालन केले तरच संसर्ग मर्यादित करू शकतो.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.