नाशिक : दिल्ली येथील ‘जेएनयू’ विद्यापिठात झालेल्या हिंसाचाराविरूध्द अवघ्या देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र विद्यार्थी, शिक्षक, विचारवंत, कलावंत रस्त्यांवर उतरून निषेध नोंदवत आहे. दरम्यान, शहरातील पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी दिलेल्या ‘महाविद्यालय बंद’च्या हाकेला प्रतिसाद देत नॅशनल उर्दू शाळा, महाविद्यालय आज बंद ठेवण्यात आले आहे. सारडासर्कल येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात तिरंगा घेत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली.देशात येऊ घातलेल्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात, सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकांचे रजिस्टर (एनआरसी), राष्ट्रीय लोकसंख्येचे रजिस्टर (एनपीआर) विरोधात सारडासर्कल येथे आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नॅशनल कॉलेज बंद करून आपला विरोध नोंदविला. या प्रसंगी नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधी अल्फिया शेख, दानिश कुरेशी व फवाद पिरजादे यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. तसेच फेडरेशनच्या वतीने अविनाश दोंदे, तल्हा शेख व विराज देवांग यांनी महाविद्यालय बंदाच्या दिलेल्या हाकमागील भूमिका सांगितली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकमताने ८ जानेवारी कामगार शेतकरी संघटनांच्या देशव्यापी संपाला पाठिंबा व्यक्त करत सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात व्यापक एकजूटीची भूमिका स्पष्ट केली. निदर्शनाच्या शेवटी माही सय्यद यांच्या पाठोपाठ सीएए व एनआरसीविरोधात कुठलेही कागदपत्रे न जमा करण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. कैफ शेख यांनी सूत्रसंचालन केले व राष्ट्रगीताने निदर्शन आंदोलनाचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालय बंद : नॅशनल उर्दू कॉलेजसमोर विद्यार्थ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:19 PM
‘महाविद्यालय बंद’च्या हाकेला प्रतिसाद देत नॅशनल उर्दू शाळा, महाविद्यालय आज बंद ठेवण्यात आले आहे. सारडासर्कल येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात तिरंगा घेत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली.
ठळक मुद्दे महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हातात तिरंगा घेत निदर्शने केली.कागदपत्रे न जमा करण्याची शपथ