नाशिक रोड, : के. एन. केला महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देणार नाही. विद्यापीठाशी बोलणे झाले असून, लवकरच विद्यार्थिनींची परीक्षा रिशेड्युल्ड करून घेतली जाईल, असे आश्वासन साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी दिले आहे. साने गुरुजी शिक्षण मंडळ संचालित के. एन. केला महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची नावेच विद्यापीठाला कळविली नसल्याने त्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. आता महाविद्यालयाकडून परीक्षेचे आश्वासन दिले जात असले तरी विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालय आश्वासन देत असल्याचे आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.
केला महिला महाविद्यालयातील सव्वाशे विद्यार्थिनींचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार असल्याचे वृत्त लोकमतमध्ये गुरुवारी प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी प्रभाग सभापती प्रशांत दिवे यांनी गुरुवारी दुपारी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी दापोरकर यांची भेट घेतली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांच्या समोर विद्यार्थिनींनी गैरकारभार उघड केला. महाविद्यालयाने जादा शुल्क घेतल्याचे तसेच परीक्षा शुल्क विद्यापीठाला न पाठविल्याची बाब प्रकर्षाने मांडली. प्राचार्यांच्या चुकीमुळे शैक्षणिक वर्ष वाया जात असल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केली. यावेळी शिक्षक आशिष कुटे सहकार्य करत नसल्याबाबत गंभीर तक्रारही करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी विद्यार्थिनींना संस्थेने मुंबईच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाशी संपर्क साधल्याचे सांगून विद्यापीठाच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले. विद्यापीठाला संस्थेकडून पुन्हा परीक्षेचे रिशेड्युल्ड करण्याचे पत्र आजच पाठवत असून, पुढील आठवड्यात सर्व विद्यार्थिनींची परीक्षा घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. विद्यार्थिनींनी जादा घेतलेले शुल्क परत देण्याबरोबर शिष्यवृत्ती द्यावी, शैक्षणिक कागदपत्रांत महाविद्यालयाकडून ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून मिळाव्यात. एफवाय, एसवाय या दोन्ही वर्षांचे निकाल लवकर मिळावेत, अशी मागणी केली. जोशी यांनी कुठल्याही विद्यार्थिनीचे वर्ष वाया जाऊ देणार नाही, जादा घेतलेली फी परत केली जाईल, असे आश्वासन दिले.
160921\16nsk_34_16092021_13.jpg
फोटो कॅप्शनके एन केला महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी