चांदवड : निफाड महामार्ग चांदवड शहरातील महात्मा फुले नगर, डावखर नगर, शेलार वस्ती, कोतवाल वस्ती येथून जातो. या महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या कामातील ढिसाळपणा व नगर परिषद हद्दीतील ड्रेनेजच्या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने केली नसल्याने कॉलनीवासीय हैराण झाले आहेत. याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेना शहर संघटक व कॉलनीतील कार्यकर्ते प्रसाद गणपत प्रजापत व परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार प्रदीप पाटील, मुख्य अधिकारी अभिजित कदम व संबंधित विभागाकडे केली आहे. या कामामुळे कॉलनी भागात छोटेमोठे अपघात झाले. तर या महामार्गावर कोणतेही साईन बोर्ड, खड्डे बुजविण्यासंदर्भात निर्देश, साईडपट्टी भरणे तसेच मार्गाला मिळणाऱ्या कॉलनीतील रस्त्यांना व्यवस्थित प्रकारे जॉइंट न केल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच मुख्य बाजारपेठेपासून दोन किमीपर्यंत दोन्ही बाजूंना ड्रेनेज असणे खूप गरजेचे आहे. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात दोन्ही कॉलनीतील घरांत घुसून नुकसान होत आहे. ठिकठिकाणी पाण्याने खड्डे भरून तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याची समस्या उद्भवू शकते. तरी या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा कॉलनीवासीय आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.
---------------------------------------------------
फोटो क्रमांक 31 एम.एम.जी.3- चांदवड-निफाड रस्त्यावरून वाहणारे ड्रेनेजचे पाणी.
310721\452431nsk_5_31072021_13.jpg
३१ एमएमजी ३