सायली वडके/ भूषण पाटील
नाशिक : प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या व्हॅलेण्टाइन दिनासाठी बाजारपेठ सजली असली तरी यंदा महाविद्यालये बंदचा परिणाम या दिवसावर जाणवत आहे. दरवर्षी व्हॅलेण्टाइन वीकपासूनच दिसणारा तरुणाईचा उत्साह यंदा दिसत नसल्याने व्हॅलेण्टाइन दिनाचा गुलाबी रंग काहीसा फिका झाल्याचे दिसत आहे.
प्रेमाचे प्रतीक म्हणून व्हॅलेण्टाइन दिनाचे महत्त्व ओळखले जाते. प्रेमाची भावना केवळ तरुण-तरुणींसाठीच असे नव्हे ते तर नात्याचा गोडवा अधिक वाढविणारा हा दिवस असल्याने आपल्या प्रिय आणि आवडत्या व्यक्तीचीच या दिवशी आठवण काढली जाते. त्यासाठी प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू दिली जाते. अशा प्रकारच्या भेटवस्तूंची दुकाने कॉलेजरोडवर सजली आहेत. लाल गुलाबी रंगाच्या आकर्षक भेटवस्तूंनी दुकानांचा रंग उजाळला आहे.
प्रतिसादाअभावी भेटवस्तूंच्या विक्रीत ५० टक्के घट झाल्याचे सिलेक्टेड गिफ्ट दुकानाचे संचालक भूषण उभराणी यांनी सांगितले, तर यंदा भरगच्च भेटवस्तूंच्या अनेक व्हराईटी असूनही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने रविवारी साजऱ्या होणाऱ्या व्हॅलेण्टाइन दिनावरच विक्री अवलंबून असल्याचे आर्ची शोरूमचे विराज सोनी यांनी सांगितले.
गेल्या आठवडाभरापासून व्हॅलेण्टाइन वीक सुरू असताना त्यासंदर्भातील सेलिब्रेशन कुठेही होताना दिसले नाही. अभावानेच काही ठिकाणी भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली मात्र त्याबाबतच उत्साह दिसून आला नाही. वास्तविक या व्हॅलेण्टाइन दिवसाच्या कालावधीत कॉलेजरोडवरील कॅफेमध्ये दिसणारी गर्दी होत असते. यंदा कॅफेतील बुकिंगही होऊ शकलेले नाही. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेण्टाइनचा रंग काहीसा फिका असला तरी येणाऱ्या दोन दिवसात उत्सवाचा रंग किती खुलतो यावर प्रेमाचा रंगही कळणार आहे.
(आर:फोटो:१२ व्हॅलेंटाईन डे)