कांदा, टोमॅटोच्या आगारात बळीराजाचे अर्थचक्र बिघडले
लोकमत न्यूज नेटवर्क
खामखेडा : शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टमाटा या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते, पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसेल तर कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दरम्यान, टमाटा लागवडीतूनही पैसे वसूल होत नसल्याने शेतकऱ्यात नाराजीचे वातावरण आहे.
दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे. अडीच हजारांवर गेलेला कांदा सहा महिने चाळीस ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी १२०० ते १३०० भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत सडत असल्याने याचा तोटाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली, पण हाच कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर होणार आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांना टमाट्यातून बऱ्यापैकी पैसे झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टमटा लागवडी केल्या ,एक एकर टमाटा पीक उभे करण्यासाठी साधारणपणे एक लाखाच्या आसपास खर्च येतो, यामध्ये ड्रीप, बांबू, तार, मल्चिंग पेपर, सुताळी, मजुरी असा मोठ्या प्रमाणात खर्च करून शेतकऱ्यांना आज मात्र या टमाटा पिकातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांवर टमाटा पिकामध्ये नांगर घालण्याची वेळ आली आहे. एकूणच कांदा आणि टमाट्याच्या आगारात शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक गणित बिघडले असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.