नाशिक : हास्यबुफे या विनोदी कथासंग्रहातील इरसाल पात्रे निखळ मनोरंजन करतात. प्रत्येकाच्या बालपणातील आठवणी ती पात्रे जागवतील. त्यातील कथा व व्यंगचित्रे यांचा समसमा संयोग वाचकांसाठी आनंददायी ठरतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, लेखक व दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी यांनी केले.
उद्वेली बुक्स निर्मित 'हास्यबुफे' या सतीश मोहोळे लिखित विनोदी कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळे यांचे शालेय सोबती मुकुंद कुलकर्णी, लोकप्रिय व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार उपस्थित होते. कथासंग्रहाचे प्रकाशन केल्यावर बोलताना मुकुंद कुलकर्णी यांनी लेखकाची जडणघडण त्याच्यावर बालपणी झालेले संस्कार, संस्कृती व अवतीभवती घडणाऱ्या प्रसंगातून होत असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. विवेक मेहेत्रे म्हणाले, विनोदी लेखक, व्यंगचित्रकार ही अल्पसंख्याक जमात असून प्रासंगिक विनोद टिकत नाहीत. चिरकाल टिकणारा विनोद निर्माण करणे, हे अत्यंत अवघड काम आहे. ते मोहोळे यांना सहज साधले आहे. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे का? असा प्रश्न मला २७ वर्षे सातत्याने पडतो. जगातील ३५०० भाषांमध्ये मराठी १६ व्या स्थानावर आहे. तरीही, पुस्तकविक्री अतिशय कमी होते. मात्र, अक्षरसाहित्य टिकले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे खुसखुशीत सूत्रसंचालन संजय शहा यांनी केले तर शुभदा मोहोळे यांनी आभार मानले.
इन्फो
व्यंगचित्रकलेच्या प्रशिक्षणाचा अभाव
राजकीय व्यंगचित्रकारांची मुस्कटदाबी होते, याकडे मेहेत्रे यांनी लक्ष वेधून घेतले. कला महाविद्यालयांंत व्यंगचित्रकला शिकवली जात नाही. व्यंगचित्रकलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळण्याची व्यवस्था नसल्याबाबत त्यांनी खंत त्यांनी व्यक्त केली. येणारा काळ नवी उमेद घेऊन येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येणारा काळ नवी उमेद घेऊन येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.