नाशिक : शहरासह जिल्ह्यात मान्सूनची वाटचाल जुलैपासून अधिक गतिमान होणार आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात दमदार पर्जन्यवृष्टी होणार असून हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या स्थितीवर मान्सूनच्या पावसाचा जोर अवलंबून राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. शहरात यंदा २७ जूनपर्यंत ३०४.८ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडे आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीप्पट पाऊस जूनच्या २७ दिवसांत पडला. यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील वर्षी केवळ १०७.६ मिमी इतका पाऊस जुनअखेरपर्यंत पडला होता.
यावर्षी केरळमध्ये वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर संपुर्ण राज्य व्यापले. नैऋ त्य मान्सूनची वाटचाल राज्यभरात झाली आहे. पाच दिवसानंतर राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने नुकताच वर्तविला आहे. कारण तोपर्यंत अरबी समुद्रातून येणारे वारे हे अधिक बळकट होतील आणि दक्षिणेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचाही जोर वाढेल, अशी आशा आहे. तोपर्यंत मध्य महाराष्टÑासह उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांत जोरदार पाऊस पुढील दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.मान्सूनच्या प्रगतीवर निसर्ग चक्रीवादळाने खूप काही परिणाम झालेला नाही, असे हवामान निरिक्षण केंद्राचे प्रमुख सुनील काळभोर यांनी सांगितले.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाल्याने खरीपाची पेरणीला मोठा आधार मिळाला. येत्या ३० जूनपर्यंत शहरासह जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील प्रदेशात जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वादळी वारा, ढगांचा गडगडाट अन् वीजांच्या कडकडाटासह वरूणराजा वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.शहरात मागील दोन दिवसांपासून विविध उपनगरांमध्ये दुपारनंतर पावसाची हजेरी कायम आहे. दोन दिवसांपुर्वी सातपूर, गंगापूररोड भागात पावसाने दमदार पुनरागमन केले. तसेच उपनगर, नाशिकरोड, अशोकामार्ग, द्वारका, वडाळागाव, इंदिरानगर, जुने नाशिकसह शहराच्या मध्यवर्ती भागातसुध्दा शुक्रवारी जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यातील मनमाड, दिंडोरी, इगतपुरी या भागात चांगला दमदार पाऊस झाला. यामुळे या भागातील पेरणीच्या कामांना आता गती येणार आहे.गंगापूर धरण समुहात दमदार हजेरीमागील २४ तासांत शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत शहरात ७.४ मि.मी पाऊस नोंदविला गेला. तसेच गंगापूर धरण समुहातील लघुप्रकल्प असलेल्या अंबोली, काश्यपी, गौतमी या धरणांच्या परिसरात मात्र जोरदार पाऊस झाला. अंबोलीत ९९ मि.मी, काश्यपीच्या पाणलोट क्षेत्रात ४५ तर गौतमीच्या पाणलोट क्षेत्रात २८ मि.मी इतका पाऊस शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत मोजला गेला.