नाशिक : राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार त्र्यंबकेश्वर पालिका हद्दीतील निर्माल्य नाशिक महापालिकेच्या खतप्रकल्पावर विल्हेवाट लावण्यासाठी आणले जात असतानाच आता राज्यशासनाच्या मुख्य सचिवांनी केलेल्या आदेशानुसार त्र्यंबकेश्वर शहरातील अन्य घनकचराही नाशिकच्या खतप्रकल्पावर स्वीकारण्याचा आग्रह पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी धरला आहे. तसा प्रस्ताव येत्या गुरुवारी (दि.१८) होणाऱ्या महासभेवर ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या खतप्रकल्पावर अगोदरच कचऱ्याचे ढीग साचत असताना आणि परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे न्यायालयीन लढाई लढत असताना त्यात आणखी त्र्यंबकेश्वरच्या घनकचऱ्याची भर पडणार असल्याने खतप्रकल्पाचे व्यवस्थापन कोलमडण्याची शक्यता आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक विधीमुळे निर्माण होणारे निर्माल्य नाशिक महापालिकेच्या खतप्रकल्पावर स्वीकारण्याचे आणि प्रतिदिन सुमारे दोन टन वाहतूक व विल्हेवाट यासाठी येणारा खर्च देण्याची तयारी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने दर्शविली होती. याबाबतचा प्रस्ताव यापूर्वी जुलै २०१४ मध्ये आला असता महासभेने तो सर्वानुमते फेटाळला होता. मात्र, तत्कालीन आयुक्तांनी सदरचा ठराव निलंबित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता आणि शासनानेही ठराव निलंबित केला. दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने सहा महिने कालावधीकरिता त्र्यंबकेश्वर नगरपालिका हद्दीतील निर्माल्य नाशिक पालिकेच्या खतप्रकल्पावर स्वीकारण्याचे आदेश काढल्यानंतर सध्या निर्माल्य स्वीकारले जात असून, त्यासाठी प्रति टन ३०० रुपये दर आकारला जात आहे. त्र्यंबक हद्दीतील निर्माल्य नाशिकला पाठविले जात असतानाच आता त्र्यंबक नगरपालिकेने निर्माल्यसोबतच शहरातील इतर घनकचरासुद्धा स्वीकारण्याची विनंती केली.
निर्माल्यपाठोपाठ त्र्यंबकचा घनकचराही येणार नाशकात आयुक्त आग्रही : येत्या महासभेत प्रस्ताव, विरोधाची शक्यता
By admin | Published: December 12, 2014 1:16 AM