नाशिक : महिला व बालकल्याण विभागाकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गंत पेठ या आदिवासी तालुक्यात मुलगी जन्माला आल्यानंतर ‘मुलीचे बारसे’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याचा शुभारंभ महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तसेच कुपोषण निर्मूलनाबाबत आढावाही घेण्यात आला.
पेठ पंचायत समितीत झालेल्या बैठकीत अंगणवाडी कामकाजासंदर्भात तसेच कुपोषित बालक, स्तनदा माता, गर्भवती माता, किशोरवयीन मुली यांना नियमित आहार दिला जातो का, याबाबत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडून माहिती घेण्यात आली. पेठ तालुक्यात जानेवारी २०२१अखेर २१ बालके अतितीव्र कुपोषित असून, आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्याकडून बालकांना नियमित आहार तसेच लसीकरण करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. कुपोषण कमी करण्यासाठी पोषणकल्पवडी या अतिरिक्त आहारामुळे बालकांच्या वजनात वाढ होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. पेठ प्रकल्पात अंगणवाडी सेविकांची १७ व अंगणवाडी मदतनीसांची ४४ पदे रिक्त असून, ही पदे मार्चअखेर भरण्याचे आदेश देण्यात आले. तसेच १३ ठिकाणी अंगणवाडी इमारतींची बांधकामे अपूर्ण असल्याचे निदर्शनाला आले असून, ही कामे तातडीने पूर्ण करुन घ्यावीत व विलंबासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सभापती आहेर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी करंजाळी येथे महिला व मुलींच्या शिवणकर्तन व ब्युटीपार्लर प्रशिक्षणाचा शुभारंभ सभापती आहेर व पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्णा गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी भुसारे व बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे उपस्थित होते.
(फोटो १२ पेठ) कॅप्शन- ‘मुलीचे बारसे’ उपक्रमाचा शुभारंभ सभापती अश्विनी आहेर यांनी केला. यावेळी पुष्पा गवळी, नम्रता जगताप, विलास कवळे यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.