गोंदे दुमाला : नांदूरवैद्य-अस्वली रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य-अस्वली या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असून आतापर्यंत लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याचे चार ते पाच वेळा भूमिपूजन करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र या रस्त्याचे दर्जेदार काम झाले नसल्यामुळे या मथळ्याखाली लोकमतने दि. २८ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्याची बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत अखेर या रस्त्यावर खडीकरण करण्यात येऊन कामास वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे. नांदूरवैद्य ते अस्वली या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची हाडे खिळखिळी होत असून वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा केली आहे. तसेच प्रत्यक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन देखील संबंधित अधिकारी निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. घोटीला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिसरातील वाहनधारकांना जीवघेण्या प्रवासाला सामोरे जावे लागत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
-----------------
डांबरीकरणाची मागणी
हा रस्ता नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावरून नेहमीच गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार रोजगारासाठी जात असतात. तसेच दुग्ध व्यावसायिक व शाळेतील विद्यार्थीदेखील याच रस्त्याने जात असल्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
---------------------
नांदूरवैद्य-अस्वली रस्त्याच्या कामाला खडीकरण करण्यात येऊन वेगाने सुरुवात करण्यात आली. (०७ गोंदे १/२)