नांदूरवैद्य : घोटी-भंडारदरा रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.घोटी- भंडारदरा रस्त्याचे घोटी ते पिंपळगाव मोर पर्यंतच कॉंक्रीटीकरण झाले मात्र पिंपळगाव मोर पासून तालुक्यातील टाकेद, खेड, अधरवड, सोनोशी, वासाळी, इंदोरे, खडकेद, आंबेवाडी, तसेच नगर जिल्ह्यातील महत्वाचे कळसूबाई शिखर, रंधा, भंडारदरा, विश्रामगढ, तांबकडा धबधबा, किल्ले बितनगड, अकोले आदी.पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या या पिंपळगाव मोर ते वासाळी फाटा पर्यंत रस्त्याला मोठ-मोठे खड्डे पडून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक तसेच वाहनधारकांनी केली होती. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये दि. ५ सप्टेंबर रोजी प्रसिदद्ध झाले होत. याबाबत आमदार माणिकराव कोकाटे यांनी दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला पञव्यवहार करून दुरूस्तीच्या सूचना देण्यात आल्या. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून प्रत्यक्षात या रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे.घोटी-भंडारदरा या महत्वाच्या असणाºया रस्त्याचे मागील वर्षी बुजवलेले खड्डे या वर्षी पुन्हा पावसाने मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहेत. तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटीला जोडणारा व टाकेद - खेड गटातील हा महत्वाचा मार्ग असल्याने परिसरातील वाहनचालक, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रामस्थ, आदी नागरिकांना या रस्त्याने नेहमी ये-जा करावी लागते तसेच या गावांमधील रुग्णवाहिकांना देखील याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या दुरावस्थेने परिसरातील नागरिक संतप्त आहेत. काही दिवसांपूर्वीच या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे यांनी देखील तीव्र आंदोलन छेडले होते. यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत अखेर या महत्वाच्या असणाºया रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरूवात केली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.--------------घोटी-भंडारदरा रस्त्याच्या कामाची सुरू असलेली दुरूस्ती.(१२ नांदूरवैदद्य१/२)