सप्तशृंगगड : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्याच टप्प्यात देशभरातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला तसेच चैत्रोत्सवनिमित्त होणारी यात्राही रद्द झाल्याने गडावरील व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.मार्च महिन्यात कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचाही समावेश होता. या निवडणुकांचे ३१ मार्च रोजी मतदान व त्याच सुमारास अर्थात दि. २ ते ८ एप्रिल या कालावधीत गडावर पारंपरिक चैत्रोत्सव पार पडणार होता. योगायोगाने दोन्ही गोष्टी लगोलग आल्याने व्यावसायिकांची द्विधा अवस्था झाली होती.त्यामुळे लॉकडाऊन होण्याआगोदरच मार्च महिन्यात व्यावसायिकांनी पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, हॉटेल व्यवसायासाठी लागणारा किराणा माल, देवीचे फोटो, जनरल साहित्य असा अनेक प्रकारचा लाखो रुपयांचा माल विक्रीसाठी भरून ठेवला होता.त्यासाठी विविध बॅँकांकडून व बचतगटांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते, परंतु कोरोनाचे संकट पाहता चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. घेतलेल्या मालाचे करायचे काय व लाखो रुपयांच्या कर्जाचे काय असे प्रश्न व्यावसायिकात उपस्थित होत होते.त्यानंतरही लॉकडाऊन शिथिल होईल या आशेवर व्यावसायिक जगत होते, परंतु लॉकडाऊन कमी न होता वाढतच गेल्याने जवळ असलेले पैसे खर्च होऊन गेले व कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यामुळे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सप्तशृंगगड तीर्थक्षेत्र बंद असल्याकारणाने येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे सप्तशृंगी देवी मंदिरावर अवलंबून आहे. येथे व्यवसायाव्यतिरिक्त कुठलाही शेती व्यवसाय नसल्याने हातावर पोट असलेल्यांची व येथील व्यावसायिकांची चिंता वाढल्याने उपासमारीची वेळ आली आहे.व्यवसाय ठप्प झाल्याने येथील पुरोहितांचे अभिषेक, पूजा, देवीची महापूजा, बंद असल्यामुळे घर प्रपंच चालवायचा कसा असा मोठा प्रश्न पुरोहित वर्गासमोर उभा राहिला आहे. सप्तशृंगगडाच्या भरवशावर जगणारे पंचक्रोेशीतील फुले-हार, दूध, भाजी विक्रेते मंदिर बंद असल्याने हातबल झाले आहेत. दि. ८ जूननंतर अटीशर्तींसह धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड मंदिर खुले होण्याची आस भाविकांना व व्यावसायिकांना लागली आहे.
गडावरील व्यावसायिक कर्जबाजारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 10:46 PM
देशभरातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला तसेच चैत्रोत्सवनिमित्त होणारी यात्राही रद्द झाल्याने गडावरील व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देदेवी दर्शनाची आस : फुले-हार, दूध, भाजी विक्रेत्यांसह पुरोहितवर्ग हतबल