सिडको : जुने सिडको येथे खासगी जागेत तसेच रस्त्यावर भरत असलेल्या भाजीबाजाराची शनिवारी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाहणी केली. मुळात हा भाजीबाजार सकाळच्या सुमारास भरत असताना आयुक्तांनी दुपारच्या सुमारास पाहणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.जुने सिडको भागात नागरिकांच्या घरासमोरील रस्त्यावर व खासगी जागा असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून भाजी बाजार भरतो. सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारातील टाकाऊ भाजीपाला हा दिवसभर तसाच राहतो व सायंकाळच्या सुमारास वरवर भरला जातो. या भाजीबाजारासमोरच नागरी वस्ती असून येथील कुजलेल्या व टाकाऊ भाजीपाल्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबात परिसरातील नागरिकांनी अनेकदा नगरसेवकांकडे तक्रारीदेखील केल्या असून हा भाजीबाजार दररोज भरत आहे. या भाजीबाजारालगत असलेल्या एका खासगी इमारतीच्या बेसमेंटमध्ये अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात शेवाळयुक्त घाण पाणी साचलेले असून, यामुळे डेंग्यू सदृश रुग्णसंख्येतदेखील वाढ होत असतानाही याकडे मनपाकडून लक्ष दिले जात नाही. प्रभागाच्या नगरसेवक कल्पना पांडे यांनी याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेत याठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करावी, असे आयुक्तांना सांगितले होते. आयुक्तांनी आज याठिकाणी येऊन पाहणी केली परंतु ती चुकीच्या वेळेत केल्याने त्यांना याठिकाणी एकही व्यावसायिक दिसून आला नाही. विशेष म्हणजे भाजीबाजार जर सकाळी भरत असताना आयुक्तांनी दुपारी पाहणी केल्याने याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
आयुक्त येणार असल्याने भाजीबाजार झाला चकाचक
By admin | Published: October 16, 2016 2:17 AM